मटण विक्री पडली महागात; जिल्हा प्रशासन सतर्क

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

सातारा जिल्ह्यात मटण, चिकन, मासे आदींची विक्री करण्यासाठीचे अद्याप काेणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. तरी देखील बहुतांश ठिकाणी छूप्या पद्धतीने विक्री केली जात आहे. नियमांचा भंग करणारे पाेलिसांच्या जाळयात सापडत आहेत.

कऱ्हाड ः शहरामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदी लागु केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत मटणाची विक्री करुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि मटण विक्रीस बंदी असतानाही दोघांनी मटण विक्री केली म्हणुन येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी आज (रविवार) ही माहिती दिली. दरम्यान जिल्ह्यात छूप्या पद्धतीने मटणाची विक्री एका किलाेस सुमारे सहाशे ते एक हजार रुपये अशी केली जात असल्याची चर्चा आहे.
 

पोलिसांची माहिती अशी ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या मोठ्या प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत सध्या शहरात पालिकेकडुन आवश्यक त्या उपायोजना करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिंग यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागु केली आहे.

त्यानुसार सध्या अनावश्यक गर्दी करणे गुन्हा आहे. मात्र तरीही आज शहरातील साजीद चॉंद शेख व विक्रम शिवाजी माने (दोघेही रा. दौलत कॉलनी, कऱ्हाड) तर जुनेद मुल्ला व मोबीन निकार कुरेशी (रा. मटण मार्केट, गुरुवार पेठ) यांनी मटण विक्रीची बंदी असतानाही मटण विक्री करुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले, अशी फिर्याद पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यवरुम संबंधित चौघांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्ह्यात येण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून आता कोणालाही प्रवेश देता येणार नाही. खोट्या संदेश फिरवणाऱ्यावर विश्वास ठेवू नका, प्रशासनाने मुंबईतून येणाऱ्याना कोणतीही मुभा दिली नाही. जिल्ह्यात येण्याचा वा जाण्याचा प्रयत्न करेल त्यावर कडक कारवाई होईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. प्रशासनाने अधोरेखित केलेल्या अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणालाही घराच्या बाहेर पडता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

मसूर ः संचारबंदीच्या काळात येथील ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत लोक रस्त्यावर येवू नयेत यासाठी ठोस उपाय योजना राबवली आहे. कोरोना नियंत्रण समितीद्वारे कामांची आखणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आजपासून किराणा साहित्य, भाजीपाला व दूध विक्रेत्यांकडून घरपोच सेवा सुरू झाली आहे. मालमजुरीवर घर चालवणाऱ्यांसाठी जीवनावश्‍यक वस्तू उधार देण्याबाबतही आवाहन केले आहे.

येथील ग्रामपंचायतीने गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रण समिती स्थापन केली आहे. गर्दीने न रहाण्याच्या सूचना लोकांना दिल्या आहेत. भाजीपाला मार्केट ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली ठेवले होते. खरेदी करताना योग्य अंतर ठेवूनच खरेदीस परवानगी दिली होती. नागरिकांनी तोंडाला मास्क, रुमाल बांधल्याशिवाय विक्रेत्यांनी त्यांना साहित्य न देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र नागरिक अपेक्षेनुसार सहकार्य करत नसल्याचा अनुभव आला. त्यामुळे किराणा साहित्यासह भाजीपाला, दूध विक्रेत्यांकडून घरपोच सेवा देण्याचा निर्णय झाला. आजपासून त्याची अमंलबजावणी सुरू झाली. त्यासाठी 21 दिवसांच्या कालावधीपर्यंत तहसीलदारांशी बोलून योग्य दर निश्चित करण्याचेही ठरले आहे. मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणाऱ्या लोकांना सावरण्यासाठी काही लोकांच्या मदतीने व्यावसायिकांना साहित्य उधार देण्यासाठी विनंती केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही ध्वनिक्षेपकावरून दिल्या जात आहेत. त्यांना घरी थांबण्याचे आवाहन केले जात आहे. न ऐकणारांच्या घराबाहेर होम क्वॉरंटाईनचा आदेश चिकटवण्यात येणार आहे. त्याशिवाय कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोरोना व्हायरस स्पर्शाने व श्वासावाटे संक्रमित होत असल्याने खोकणे, शिंकणे, थुंकणे, स्पर्श करणे आदी बाबींबद्दल काळजी पूर्वक राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

संचारबंदीच्या काळात ग्रामपंचायतीद्वारे रस्ता, गटार सफाई, घंटागाडीतून ओला-सुका कचरा गोळा करण्याचे काम सुरू असून गावातून औषध फवारणीही केली आहे. किराणा साहित्य विक्रेत्यांनी एक मीटर अंतरावर ग्राहकासाठी चौकोन आखला असून क्रमांकानुसार ग्राहकांना माल दिला जात आहे. काहींनी शटरच्या आतुन प्रवेशद्वारावर माल विक्री सुरू ठेवली आहे. पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. गावात, भागात फिरून संचारबंदीच्या काळात लोकांना बाहेर न पडण्याचे व नियमाचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काहीजण नियमांचे उल्लंघन करत मोटारसायकलवरून बिनधास्त फिरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Meat Shopkeepers For Illegal Sale In Karad