हुतात्मा दिनावरही कर्नाटक पोलिसांनी घातली बंदी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

१७ जानेवारी रोजी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे; पण हा कार्यक्रम घेऊ नये, अशी नोटीस निपाणी पोलिसांनी मराठी नेते व कार्यकर्त्यांना आज रात्री बजावली आहे.

निपाणी (बेळगाव) - सीमाप्रश्‍नी हुतात्म्यांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही १७ जानेवारी रोजी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे; पण हा कार्यक्रम घेऊ नये, अशी नोटीस निपाणी पोलिसांनी मराठी नेते व कार्यकर्त्यांना आज रात्री बजावली आहे. त्यामुळे येनकेन प्रकारे मराठी भाषकांवर दबावतंत्राचे सत्र कर्नाटक सरकारने सुरूच ठेवल्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.

साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमही टार्गेट

अलीकडे कर्नाटक सरकारने मराठी भाषकांची प्रत्येक क्षेत्रात गळचेपी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातून साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमही टार्गेट केले जात आहेत. रविवारी (ता. १२) कुद्रेमानी (बेळगाव) व इदलहोंड (ता. खानापूर) येथील साहित्य संमेलन होऊ नये, यासाठी खटाटोप केला. तेथेही आयोजकांना नोटीस बजावण्यात आली होती. शिवाय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व इदलहोंडला जाणारे तेथील संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना रोखण्यात आले होते. तरीही तेथील मराठी भाषकांनी तितक्‍याच प्रचंड गर्दीने हे संमेलन यशस्वी करून दाखवले. निपाणीत होणाऱ्या संमेलनालाही परवानगी नाकारली. त्यामुळे येथील संमेलन महाराष्ट्र हद्दीत देवचंद कॉलेजमध्ये घेण्याचे ठरले. त्यानंतरही मराठी भाषकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोखण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केल्याचे निपाणीतील या नोटीसीवरून दिसून येते.

वाचा - चंदगडी भाषा आता युजीसी अभ्यासक्रमात...

निपाणीच्या मंडल पोलिस निरीक्षकांनी नोटीस देताना गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून दोन्ही भागात तणावाच्या घटना घडल्या आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यास, वक्‍त्या, पाहुणा म्हणून आणता येणार नसल्याचे म्हटले आहे. हुतात्मादिनी अभिवादन करण्यासाठी मागितलेली परवानगी मिळणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कोगनोळीजवळ महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी आंदोलन करून कर्नाटकविरोधी भूमिका घेतल्याचे व त्यामुळे सीमाभागात पडसाद उमटू शकतात, असे त्यांनी नमूद केले आहे. निपाणीत प्रतिवर्षाप्रमाणे आपण कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकांना निमंत्रित करता, ते केल्यास कर्नाटकात त्याचे परिणाम दिसण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी कोणतीही फेरी काढण्यासाठी वा कार्यक्रमासाठी परवानगी देता येणार नाही. जर काही अघटित घडल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल, असे कारण पोलिस निरीक्षकांनी दिले आहे.
नोटीस देताना जयराम मिरजकर, बाबासाहेब खांबे, संजय सांगावकर, विकास चव्हाण, नंदकुमार कांबळे, नवनाथ चव्हाण, हरीश साळवे यांची नावे नमूद केली आहेत.

केवळ घाबरवण्यासाठी

पोलिसांनी नोटीसीमध्ये सबनीस यांनी कर्नाटकवर केलेल्या टीकेचा, कोगनोळीजवळ शिवसेनेने केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केलेला आहे. यामुळे यंदा हुतात्मा दिनाचा कार्यक्रम करू नये, असे म्हटले आहे. नोटीस देताना आपण महाराष्ट्रातील कोणालाही बोलवू नये, असे म्हटले आहे. पण कार्यक्रम केल्यास आपली जबाबदारी राहील, असेही नमूद आहे. त्यामुळे पोलिसांनी मराठी भाषकांना घाबरवण्यासाठीच व गर्दी होऊ नये, म्हणून हा खटाटोप चालवल्याची भावना मराठी भाषकांमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebration of hutatma din in nipani band by karnataka police