मराठा आरक्षणासाठी केंद्र आणि राज्याने ताकद लावावी...मराठा क्रांती मोर्चाचे सांगलीत धरणे

बलराज पवार
Friday, 25 September 2020

सांगली-  राज्य सरकारने दिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने एकत्रित ताकदीने प्रयत्न करावेत. आरक्षणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत शासकीय नोकर भरती करु नये आदी मागण्यांसाठी सांगलीत आज मराठा क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. 

सांगली-  राज्य सरकारने दिलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने एकत्रित ताकदीने प्रयत्न करावेत. आरक्षणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत शासकीय नोकर भरती करु नये आदी मागण्यांसाठी सांगलीत आज मराठा क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. 

सांगलीतील मारुती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आरक्षण प्रश्‍नी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपुर्वी आमदारांच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात आले होते आज सोशल डिस्टन्सचे पालन करीत आणि तोंडाला मास्क लावून कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. 

मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील म्हणाले, राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती देताना हा खटला घटनापीठाकडे वर्ग केला आहे. मात्र न्यायालयाच्या स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती, शिष्यवृतीही त्यांना मिळणे गरजेचे आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य शासनाने कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये, अशी मागणीही त्यांनी केली. 

आंदोलनात महेश खराडे, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, संभाजी पोळ, अतुल माने, नितीन चव्हाण, भाऊसाहेब पवार, विजय धुमाळ, विश्‍वजित पाटील, अमोल गोटखिंडे, अमोल सुर्यवंशी, अशोक पाटील, स्वप्नील सावंत, बाळासाहेब सावंत, राहूल पाटील यांच्यासह मराठा कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Center and the state should make efforts for Maratha reservation