स्वच्छ सर्वेक्षणात अव्वलतेचे आव्हान ; ऑनलाइन मते नोंदविण्यास झेडपी कार्यरत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

 स्वच्छ सर्वेक्षण मोबाईल ऍपद्वारे मत नोंदवताना आमदार मकरंद पाटील. शेजारी स्वच्छता विभागाचे कर्मचारी. 

सातारा : स्वच्छतेचा दर्जा वाढवून संपूर्ण देश दोन ऑक्‍टोबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने उपक्रम राबविले आहेत. यावर्षीही नव्याने स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू झाले असून, देशात अव्वल ठरलेल्या सातारा जिल्हा परिषदेला यावेळी गुणवत्ता राखावी लागणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. 

केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने नुकताच स्वच्छ सर्वेक्षणचा (ग्रामीण) प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणातून स्वच्छतेच्या कामाचा विविध 
मानांकाच्या आधारावर आणि संख्यात्मक आणि गुणात्मक कामाच्या आधारावर गुणानुक्रमांक ठरविण्यात येणार आहेत. 
देशातील 34 राज्ये, 698 जिल्ह्यांतील 87 हजार 375 सार्वजनिक ठिकाणी हे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात किमान दोन कोटी 50 लाख नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 25 पेक्षा जास्त ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजाराची ठिकाणे, प्रार्थनास्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी या सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता तपासली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षणात देशात अग्रेसर राहण्यासाठी अधिक सक्षमतेने पदाधिकारी, अधिकारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यरत राहावे लागणार आहे. ऑनलाइन सर्वेक्षणात बाजी मारण्याचे आव्हानही जिल्ह्यापुढे आहे. 

...असे होणार गुणांकन 

सेवा पातळीवरील प्रगतीस 35 टक्के, सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत थेट निरीक्षणास 30 टक्के, नागरिकांच्या प्रतिक्रिया यास 35 टक्के असे 100 टक्‍क्‍यांत गुणांकन होणार आहे. प्रतिक्रियांमध्ये गावातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आणि नागरिकांच्या ऑनलाइन प्रतिक्रिया यांचा समावेश असणार आहे. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मते नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले आहे. 

सर्वेक्षणाचे वेळापत्रक 

25 ऑगस्टपर्यंत-प्रत्यक्ष गावस्तरावर सर्वेक्षण 
15 सप्टेंबर-सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होणार 
02 ऑक्‍टोबर-राष्ट्रीय स्तरावर बक्षीस वितरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The challenge of top ranking in clean surveys