काय आहेत सांगली जिल्ह्यात काँग्रेससमोरची आव्हाने...?

बलराज पवार
Monday, 24 February 2020

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. पलूस कडेगाव मतदार संघ राखतानाच जत पुन्हा हिसकावून घेतले. तर सांगलीत निकराचा संघर्ष केला. येथे थोडक्‍यात पराभव पत्करावा लागला.

सांगली - राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्याच्या निमित्ताने सत्तेत येऊनही काँग्रेसमध्ये अद्याप उत्साह दिसत नाही. जिल्ह्यात दोन आमदार आणि एक मंत्रिपद अशी उजवी कामगिरी असलेल्या काँग्रेससमोर आता पुन्हा विस्ताराचे आव्हान आहे. मंत्री डॉ. विश्‍वजित कदम आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील या दोन युवा नेत्यांकडे काँग्रेस कार्यकर्ते आशेने पाहत आहेत. ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेसला सुरुंग लावण्यास सुरवात केली असताना हे युवा नेते पक्ष कसा वाढविणार, याकडे लक्ष आहे.

दोन आमदार आणि एक मंत्रिपद, तरी सर्वच गटांत अनुत्साह

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. पलूस कडेगाव मतदार संघ राखतानाच जत पुन्हा हिसकावून घेतले. तर सांगलीत निकराचा संघर्ष केला. येथे थोडक्‍यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर तर डॉ. विश्‍वजित कदम यांना राज्यमंत्रिपदही मिळाले. त्यांचे स्वागत जिल्ह्यात मोठ्या उत्साहात झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य येईल असे वाटत होते. पण, अजूनही म्हणावा तसा उत्साह काँग्रेसमध्ये दिसत नाही.‘राष्ट्रवादी’चा विस्तारावर भर
याउलट राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या उत्साहात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अपेक्षेप्रमाणे मोठे खाते मिळालेच शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच  त्यांनी आता जिल्ह्यात पुन्हा बस्तान बसवायला सुरवातही केली. विट्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांना  पक्षात घेत खानापूर तालुक्‍यात आपली ताकद वाढवली आहे. काँग्रेसला हा धक्का असला तरी लोकसभा निवडणुकीवेळीच ते राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत होते. पाठोपाठ महापालिका क्षेत्रातही पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

वाचा - अबब... या पक्षाने रात्रीत मारला दोन एकर द्राक्षांवर डल्ला...

महापालिका क्षेत्रात आजही काँग्रेसची ताकद

काँग्रेस सुस्तचराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराकडे गांभीर्याने पाहत असताना काँग्रेस मात्र  अजून सुस्तावस्थेत दिसत आहे. मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडे सांगलीचे संपर्क मंत्रिपदही देण्यात आले आहे. शिवाय राज्यमंत्रिपदही असल्याने कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष विस्तारण्याची त्यांना संधी  आहे. पण काँग्रेसमधील गट तट पाहता त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रात आजही काँग्रेसची ताकद आहे. मदनभाऊ गट अद्याप कुणाच्या गळाला लागलेला नाही. या गटाने श्रीमती जयश्री पाटील यांच्या मागेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राष्ट्रवादीने श्रीमती जयश्री पाटील यांनाच पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा असल्याने हा गटही अस्वस्थ आहे. जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीत जाण्यावरून मदनभाऊ गटात मतभेद आहेत. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर वसंतदादांचे नातू विशाल पाटीलही पक्षात सक्रिय झालेले दिसत नाहीत. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभेला चांगली लढत दिल्याने काँग्रेसमध्ये तेव्हा चांगले वातावरण होते. पण, ते लवकरच मावळले.

त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा

युवा नेत्यांकडून अपेक्षा काँग्रेसला विस्तारण्याची संधी असतानाही  नेत्यांमध्येच सुसंवाद नसल्याने कार्यकर्ते निराश आहेत. विशाल पाटील आणि मंत्री विश्‍वजित कदम यांच्यात म्हणावा तसा सुसंवाद नाही हीच कार्यकर्त्यांची सल आहे. त्यातच राष्ट्रवादीत जाण्याच्या जयश्री पाटील यांच्या हालचाली असल्यावरूनही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे पक्ष विस्ताराचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिरजेतील कार्यक्रमात दादा घराण्याला लक्ष्य केल्यानंतर तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. डॉ. विश्‍वजित कदम यांनी दोनवेळा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषवल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या त्वेषाने जिल्ह्यात फिरून कार्यकर्ते रिचार्ज केले तसेच पुन्हा एकदा जिल्ह्यात फिरून काँग्रेसची बांधणी करावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र हे दोन्ही नेते स्वत: भोवती चौकट आखून काम करत असल्याने काँग्रेसला संधी असतानाही विस्तारासाठी संघर्ष करावा लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenges in front of Congress in Sangli district