
आवक कमी असल्यामुळे एरव्ही 10 ते 15 रूपये किलो दर असलेल्या चमेली बोराला सांगली फळ मार्केटमध्ये 71 रूपये किलो उच्चांकी दर मिळाला.
सांगली : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वाणातून दिल्या जाणाऱ्या बोराची आवक यंदा मंदावली आहे. आवक कमी असल्यामुळे एरव्ही 10 ते 15 रूपये किलो दर असलेल्या चमेली बोराला येथील फळ मार्केटमध्ये 71 रूपये किलो उच्चांकी दर मिळाला. मंगळवेढा, सांगोला भागातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
जानेवारीतील पहिला सण म्हणजे भोगी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत येते. याच काळात शेतीला चांगला बहर येतो. शेतात वाटाणा, हरभरा, ऊस, गाजर, शेंगा, बोर यांची आवक होते. त्यामुळे संक्रांतीला सवाष्णींना दिल्या जाणाऱ्या सुगडातून इतर पदार्थांबरोबर बोरे देखील दिली जातात.
संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू कार्यक्रम होतो. त्यात वाण दिले जाते. बाजारात बोर खरेदीला पसंती दिली जाते. बाजारात ऍपल बोरांची आवक जास्त आहे. संक्रांतीला पूजेसाठी लागणाऱ्या चमेली बोराची आवक कमी आहे.
विष्णू अण्णा पाटील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर भागातून बोरे येतात. परंतू यंदा उत्पादन कमी आहे. आवक कमी असल्याने दर वाढलेत. एरव्ही 10 ते 15 रूपये किलो दर मार्केटमध्ये असतो. परंतू आज फळमार्केटमध्ये अशोक दत्तू मदने यांच्या पेढीवर झालेल्या सौद्यात 71 रूपये प्रति किलो असा उच्चांकी दर शेतकऱ्यांना मिळाला.
मंगळवेढा व सांगोल्यातील शेतकऱ्यांना उच्चांकी दर मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. फळ मार्केटमध्ये चमेली बोराला उच्चांकी दर मिळाल्यामुळे किरकोळ विक्रीचा दर मात्र 80 रूपयांहून जास्त असल्याचे चित्र आहे. फळ मार्केटमध्ये 50 किलो वजनाच्या 100 ते 150 पोत्यांची आवक आहे.
संपादन : युवराज यादव