खावटी पीककर्ज माफीसाठी चंद्रकांत पाटील करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

खावटी पीककर्ज माफीसाठी चंद्रकांत पाटील करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोल्हापूर - जिल्हा (केडीसीसी) बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले पीककर्ज सरळ आणि खावटी पद्धतीने दिले आहे. यामधील सरळ दिलेले कर्ज माफ झाले आहे. मंगळवारी (ता. २८) होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खावटी पीककर्जही माफ करण्याबाबत आणि पीककर्जामधील बारकाव्यांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली; तर अडीच एकर जमीन असणाऱ्या ८२ टक्के शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल, ते ते करायला तयार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

पूरग्रस्त चिखली (ता. करवीर) येथील ग्रामस्थांशी चर्चा करताना ते बोलत होते. पीककर्ज माफी दिली; मात्र जिल्हा बॅंकेने याच पीककर्जाचे दोन भाग केल्यामुळे खावटी पद्धतीने घेतलेल्या पीककर्जाचीही माफी मिळावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांनी शेतीसाठी जेवढे म्हणून पीककर्ज घेतले आहे, ते सरकार व्याजासह भरणार आहे. अडीच एकरपर्यंत शेती असणाऱ्यांचे हे पीककर्ज माफ केले आहे. अडीच एकर शेती असणारे जिल्ह्यात ८२ टक्‍के शेतकरी आहेत. ज्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना तिप्पट रकमेचा लाभ दिला आहे; पण खावटी कर्ज हे कोल्हापुरातच दिले जात असेल; तर कर्जमाफी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 

दरम्यान, पीककर्जाच्या सरळ आणि खावटी अशा दोन व्याख्या केल्या आहेत. शासनाने सरळ पीककर्जासाठीच माफी जाहीर केली आहे; पण खावटी हेही पीककर्ज म्हणूनच घेतले असल्याची भूमिका चिखली ग्रामस्थांनी मांडली. या वेळी, आमदार चंद्रदीप नरके, एस. आर. पाटील, रघू पाटील, बी. बी. यादव, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी उपस्थित होते. 

जिल्ह्यात ४०० कोटींचे खावटी कर्ज
जिल्हा बॅंकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४०० कोटींपर्यंतचे खावटी कर्जवाटप केले आहे. हे वाटप करताना सरळ आणि खावटी अशा दोन व्याख्या केल्या आहेत. हे पीककर्ज देताना मंजुरीच्या ५५ टक्‍के कर्ज दिले जाते. उदाहरणार्थ १ लाख सरळ पीककर्ज दिले असेल, तर त्याला ५५ हजार रुपये खावटी पीककर्ज दिले जाते. हे दोन्ही कर्ज पीककर्ज म्हणूनच दिले आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बॅंका सरळ आणि खावटी असा कोणताही भेदभाव न करता हेक्‍टरी सरळ १ लाख ५० हजार रुपये देतात. त्यामुळे आता शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर, जिल्हा बॅंकेच्या खावटी पीककर्ज घेतलेल्यांना तोटा सहन करावा लागणार असल्याची परिस्थिती ग्रामस्थांनी मांडली. 

मुख्यमंत्रीच अध्यक्ष : 
कोल्हापूर-सांगली पूरस्थिती निवारणासाठी तयार केलेल्या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी जे-जे करता येईल, ते ते करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे आपण कोणतीही चिंता करू नका, शासन तुमच्या सोबत असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

गुऱ्हाळ घरांनाही नुकसानभरपाई :
चिखली (ता. करवीर) येथील पूरग्रस्तांना सोनतळी येथे जाग देऊन घर बांधणीसाठी अडीच लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, पूरबाधित ३५ गुऱ्हाळ घरे बांधून देण्यासह नुकसानभरपाई देण्याबाबतही मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. 

चिखली गावाला १९८९ ला जागा दिली आहे. मात्र, याचा ताबा किंवा कोणतीही शासकीय कागदपत्रे दिलेली नाहीत. दिलेले प्लॉट संबंधित व्यक्तीच्या नावावर करून दिले पाहिजेत. यासाठी विशेष समिती नियुक्त करावी, अशीही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. 
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com