Chandrayaan 2 : चांद्रयान मोहिमेत दुरुस्तीचे क्षण रोमांचकारी!

प्रकाश कोकितकर
बुधवार, 24 जुलै 2019

सेनापती कापशी - चांद्रयान-२ चे प्रक्षेपण १५ जुलैला मध्यरात्री अचानक थांबविण्यात आले. त्यानंतर दुरुस्ती होऊन यशस्वी प्रक्षेपणापर्यंतचा पाच दिवसांतील क्षण अन्‌ क्षण मी कधीही विसरू शकत नाही. अविश्रांत काम केल्यानंतर दोष दूर झाला. तो क्षण माझ्यासाठी अवर्णनीय आनंद देणारा होता, अशी भावना इस्रोचे शास्त्रज्ञ आणि कागल तालुक्‍यातील जैन्याळचे सुपुत्र यशवंत बांबरे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

सेनापती कापशी - चांद्रयान-२ चे प्रक्षेपण १५ जुलैला मध्यरात्री अचानक थांबविण्यात आले. त्यानंतर दुरुस्ती होऊन यशस्वी प्रक्षेपणापर्यंतचा पाच दिवसांतील क्षण अन्‌ क्षण मी कधीही विसरू शकत नाही. अविश्रांत काम केल्यानंतर दोष दूर झाला. तो क्षण माझ्यासाठी अवर्णनीय आनंद देणारा होता, अशी भावना इस्रोचे शास्त्रज्ञ आणि कागल तालुक्‍यातील जैन्याळचे सुपुत्र यशवंत बांबरे यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

श्री. बांबरे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
ते म्हणाले, ‘‘ज्या तांत्रिक त्रुटीमुळे प्रक्षेपण थांबविण्यात आले, तो बिघाड माझ्याच लाँच व्हेईकल विभागात होता. त्या वेळी आमच्यावर प्रचंड दडपण होते. पाच दिवस रात्रंदिवस अविश्रांत काम केले आणि ‘टीम इस्रो’ला यश मिळाले. तो संपूर्ण काळ रोमांचित करणारा होता. समस्या कशी सोडविली जाते, याचा उत्तम अनुभव मिळाला. प्रचंड आत्मविश्वास मिळाला. मला ही केवळ सुवर्णसंधी नव्हती, तर वरिष्ठांकडून आयुष्यभरासाठी मिळालेली अनुभवाची शिदोरी होती. माझ्यासाठी हा अवर्णनीय आनंद आहे.’’

ते म्हणाले, ‘‘वडील सखाराम बांबरे, मामा नामदेव बोंगार्डे, भाऊ गुरुदास, मित्र आणि ग्रामस्थांनी मोबाईलवर संपर्क करून माझे खूप कौतुक केले. चांद्रमोहीम-२ वर संपूर्ण जगाचे लक्ष होते. त्यासाठीचे लाँच व्हेईकल संपूर्ण भारतीय बनावटीचे होते. येथे काम करणाऱ्यांवर प्रचंड दडपण होते; मात्र वरिष्ठांच्या मार्गदर्शनातील सहजपणा, समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकाला विश्‍वासात घेण्याची पद्धत, यामुळे सातत्याने बळ मिळाले. आमच्या टीमने यशस्वी प्रक्षेपणापर्यंत न थकता काम केले. तांत्रिक त्रुटी दूर झाल्या आणि सोमवारी चांद्रयान झेपावले.’’

वाचनाचे वेड...
यशवंत यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या जैन्याळ गावातील शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सेनापती कापशी येथील रानडे विद्यालयात तर इयत्ता बारावी विज्ञानचे शिक्षण अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुणे येथील मराठा मंडळाच्या टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमधून ते बीई मेकॅनिकल झाले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. इस्रोच्या परीक्षेत ते २०१५ ला यशस्वी झाले आणि १३ मे २०१६ ला रुजू झाले. शाळेत जाण्यासाठी ते घरातून लवकर बाहेर पडत आणि थेट वाचनालयात जात. तेथे वृत्तपत्र, मासिके वाचूनच शाळेला जायचे हा त्यांचा नित्यक्रम होता. यामुळे अवांतर माहिती, ज्ञान आणि खूप प्रेरणा मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षेतील अपयश पचवूनच इस्रोत जाण्याची संधी त्यांना मिळाली. संशोधनात काम करण्यास खुले वातावरण आहे, त्याचा खूप फायदा होतो, असेही ते म्हणाले.

या मोहिमांमध्येही सहभाग
श्री. बांबरे यांचा २०१७ मधील जीएसएलव्ही एमके ३ डी १ जीसॅट १९ आणि २०१८ मधील जीएसएलव्ही एमके ३ डी २ जीसॅट २९ या मिशनमध्येही सहभाग होता. आता ज्या जीएसएलव्ही एमके ३ साठी यशवंत यांनी काम केले, त्या पुढील मानवाला अंतराळात पाठविण्यासाठीच्या मोहिमेसाठीचे काम सुरू आहे. त्यातही यशवंत यांचा सहभाग असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 e campaign repair moment was thrilling!