कृषी विभागाच्या पीक स्पर्धांत बदल; आता एकाच वर्षाचे पिक स्पर्धेसाठी ग्राह्य धरणार

अनिलदत्त डोंगरे
Monday, 28 December 2020

राज्यात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांत शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या उत्पादनात वाढ होते. हाच उद्देश ठेवून शासनाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवली आहे.

खानापूर (जि. सांगली) : राज्यात पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांत शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या यशाबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास मनोबल वाढते. नव्या उमेदीने ते नवनवीन तंत्रज्ञानाने पिके घेतात. कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी योगदान देतात. त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या उत्पादनात वाढ होते. हाच उद्देश ठेवून शासनाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवली आहे.

या योजनेत सहभागींना राज्यस्तरावरील सर्वोच्च पारितोषकासाठी स्वतःची शेतात तीन वर्षे सातत्याने एकच पीक घ्यावे लागते. उत्पादकतेत सातत्य राखावे लागते. अवकाळी, आपत्कालीन नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती उद्भवल्यास उत्पादकतेत घट होते. या बाबी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सहभागी होता यावे. एकाच वर्षात त्या पिकांच्या येणाऱ्या उत्पादकतेवर स्पर्धेत सहभागी होता यावे या उद्देशाने पूर्वीच्या पद्धतीत बदल करण्यात येत आहे. यापुढे ही स्पर्धा तीन टप्प्यांत एकाच वर्षात आयोजित केली आहे. त्यावर्षीची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर बक्षिसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या प्रस्तावावर विचार करून समित्यांचे पुनर्गठन, पात्रतेचे निकष, विविध प्रपत्र, पीक स्पर्धा विजेत्यांची संख्या, स्वरूप, बक्षीसांची रक्‍कम यात वाढ करणे, स्पर्धा वेळापत्रक विहित करणे तसेच विविध स्तरावरील स्पर्धेसाठी निकषांत कालानुरूप बदलाची आवश्‍यकता लक्षात घेऊन पीक स्पर्धेबाबत सन 2020-21 च्या रब्बीपासून पीक स्पर्धेच्या निकषांत बदल केले आहेत.

पिकांच्या यादीत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल (खरीप), तर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या पिकांची रब्बीसाठी निवड केली आहे. सर्व शेतकऱ्यांना स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्यांकडे नावावर जमीन असली पाहिजे. जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे. एकावेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. 

अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांनी दिली. माहितीसाठी कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

अर्ज दाखल करण्याचे महिने 

अर्ज दाखल करण्याची तारीख अशी ः खरीप - मूग व उडीद पीक 31 जुलै; भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल 31 ऑगस्ट; तर रब्बीसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ 31 डिसेंबर 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in crop competition of the Department of Agriculture; Now a single year's crop will be considered for the competition