
दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित वैशिष्ट्येपूर्ण चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. तो चित्ररथ मूळचे सांगलीचे कलाप्रेमी राहुल धनसरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ते सांगलीतील गव्हर्मेंट कॉलनीतील रहिवासी आहेत.
सांगली ः दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित वैशिष्ट्येपूर्ण चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. तो चित्ररथ मूळचे सांगलीचे कलाप्रेमी राहुल धनसरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ते सांगलीतील गव्हर्मेंट कॉलनीतील रहिवासी आहेत.
श्री. धनसरे यांनी यापूर्वीही शासनाचे विविध चित्ररथ तयार केले आहेत. निवडणूक आयोग, कृषी विभाग तसेच क्रीडा विभागाच्या चित्ररथ तयार करण्यात त्याचा सहभाग राहील आहे. त्यांनी तयार केलेल्या चित्ररथास शासनाचे विशेष पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होतात. येथील कॅंटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यासाठी धनसरे व त्यांची टीम गेले अनेक दिवस कार्यरत होती.
या रथावर महाराष्ट्राच्या संत परंपरेसह प्रतिकृतीचे खास आकर्षण होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी राजपथावर साकारलेल्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणीपर्यंत धनसरे यांचे योगदान राहिले आहे. संकल्पनाचित्र व त्रिमिती प्रतिकृती रोशन गुले आणि तुषार प्रधान या तरुणांनी तयार केली आहे. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कलाकारांच्या योगदानातून हा चित्ररथ साकारला.
प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फुटांची आसनस्थ मूर्ती लक्षवेधत होती. मूर्तीसमोर "ज्ञानेश्वरी ग्रंथ', मध्यभागी "भक्ती आणि शक्ती' चा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे दोन पुतळे उभारले होते. या पाठोपाठ पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची मूर्ती व शेवटी संतवाणी हा संतांच्या वचनाचा 8 फूट उंचीचा ग्रंथ उभारला होता. दोन्ही बाजूस संतश्रेष्ठ जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या प्रतिकृती होत्या.