कोरोनावर संगीतोपचाराची "बुवाबाजी'; सांगलीत छुपे प्रकार; भामट्यांपासून रुग्णांना धोका

जयसिंग कुंभार
Tuesday, 27 October 2020

सारे जग कोरोनावरील उपचार शोधण्यासाठी रात्रंदिवस खटपट करीत असताना, सांगली शहरातील काही महाभाग म्युझिक थेरपीद्वारे कोरोनावर उपचाराचा प्रकार करीत आहेत.

सांगली ः सारे जग कोरोनावरील उपचार शोधण्यासाठी रात्रंदिवस खटपट करीत असताना, शहरातील काही महाभाग म्युझिक थेरपीद्वारे कोरोनावर उपचाराचा प्रकार करीत आहेत. अशा प्रकारांपासून रुग्णांच्या जीवाला धोका संभवतो, असा दावा करणाऱ्यांपासून सावधान राहा, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

एखादी आपत्ती आली की त्यात संधी शोधण्यासाठी भामटे पुढे येतात. कोरोना आपत्तीकाळातही असे प्रकार सुरू आहेत. शहर परिसरातील एका म्युझिक थेरपी तज्ज्ञाने सध्या आपले दुकान सुरू केले असून, तो संगीताद्वारे कोरोना बरा करण्याचा दावा करीत आहेत. त्यासाठी तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोणतेही उपचार न घेता कसे बरे केले, याचे दाखले देत प्रयोग करत आहे, अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.

सध्या त्याच्याकडून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका संभवतो. मुळात बरे झालेले रुग्ण संगीताच्या उपचारामुळे आहेत, याचा कोणताही पुरावा नाही. कोरोनामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरुपाचे रुग्ण आढळतात. त्यात सौम्य लक्षणे असणारे रुग्ण औषधोपचाराविनाही बरे होतात. त्यामुळे असे रुग्ण म्युझिक थेरपीरामुळे बरे झाले, असे म्हणणे चुकीचे आहे, मात्र त्याचे दाखले देत त्याचे संगीतोपचाराबाबत अव्वाच्या सव्वा दावे सुरु आहेत. अशा बुवाबाजीपासून लोकांनी सावध राहावे व कोरोनासाठी डॉक्‍टरांच्या सल्यानेच उपचार घ्यावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. 

तत्काळ कारवाई केली जाईल

संगीत हा पूरक उपचार आहे. तो कोणत्याही रोगावरील ठोस औषध नाही. कोरोनाच्या बाबतीत शासनाने जी उपचारपद्धती मान्य केली आहे, त्यानुसारच उपचार झाले पाहिजेत आणि याबाबत कोणी विरोध करत असेल तर अशा व्यक्‍ती संस्थांवर तत्काळ कारवाई केली जाईल. 
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी 

गीतोपचाराचा रुग्णाच्या जीवाला धोका

कोरोनाचा विषाणू आहे. त्याचे अस्तित्व व परिणाम सिद्ध झाला आहे. संगीतोपचार हे मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी होतात. त्यामुळे त्याचा कोरोना विषाणूवर अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणाताही परिणाम होणार नाही. रीतसर औषधोपचारानंतर मानसिक स्वास्थ्यासाठी संगीतोपचार केले, तर हरकत नाही मात्र केवळ संगीतोपचाराचा रुग्णाच्या जीवाला धोका आहे. 
- डॉ. अनिल मडके, श्‍वसनरोग तज्ज्ञ 

 संगीत उपचाराबाबतचे संशोधन बाल्यावस्थेत
संगीत उपचाराबाबतचे संशोधन प्रगत देशांमध्ये बाल्यावस्थेत आहे. मानसिक आजारांमध्ये संगीतोपचाराचा पूरक उपचार म्हणून आपल्याकडे उपयोग होतो, मात्र बऱ्याचदा विज्ञानाची भाषा सांगत अघोरी प्रकार होतात. ही नवी बुवाबाजी आहे. बॅक्‍टेरिया किंवा जंतूजन्य आजारात संगीतोपचाराचा काहीही उपयोग होत नाही. वैद्यकीय उपचार पद्धतीच पाहिजे. 
- प्रा. प. रा. आर्डे, सल्लागार संपादक, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating in music therapy on corona in Sangli; danger to patients