छत्रपती शिवरायांवर हिंदी, इंग्रजी चित्रपटही बनवू ; डॉ. कोल्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Amol kolhe

छत्रपती शिवरायांवर हिंदी, इंग्रजी चित्रपटही बनवू ; डॉ. कोल्हे

प्रश्‍न : ‘शिवप्रताप गरुडझेप’ कधी प्रदर्शित होतोय, वैशिष्ट्य काय?

डॉ. कोल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘आग्रा भेट आणि सुटका’ हा थरार उलगडणारा हा सिनेमा आहे. साडेतीनशे वर्षांच्या जुलमी मुघल राजवटीसमोर शिवराय स्वाभिमानाने उभे ठाकले, हा देदीप्यमान इतिहास तितक्याच भव्यतेने आम्ही घेऊन आलो आहोत. काही चित्रीकरण लाल किल्ल्यात झाले आहे. सात भव्य सेट उभे करून दिमाखदार कलाकृती साकारण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरला मल्टिप्लेक्समध्ये आणि ७ ऑक्टोबरला सिंगल स्क्रीन सिनेमागृहात तो प्रदर्शित होईल. ‘मिड वीक’ला सिनेमा प्रदर्शित करण्याचे धाडस आम्ही दाखवले आहे आणि त्याने बॉलिवूड अचंबित आहे. असे धाडस करणारे कोण आहेत, असा त्यांना प्रश्‍न पडलाय. आम्ही धाडसी नाही, तर विषयातच हिंमत आहे.

प्रश्‍न : चित्रपटसृष्टीसाठी चित्रपट तारणहार ठरेल का?

डॉ. कोल्हे : शिवरायांचा इतिहास समोर आणताना केवळ व्यावसायिक दृष्टीने पाहून चालत नाही, त्याला विविध आयाम असतात. त्याहून मोठा विचार असतो. दिल्लीत मला मंत्री अनुराग ठाकूर आणि तेलंगणाचे एक खासदार भेटले. ते म्हणाले, ‘‘दक्षिणेत एका चंदन तस्करावरील सिनेमा (पुष्पा) आणि कोलार खाणीवरील सिनेमा (केजीएफ) कोट्यवधीचा व्यवसाय करतात. छत्रपती शिवाजी महाराज तुमची अस्मिता आहेत, आराध्य दैवत आहेत, मग तुम्ही शंभर कोटींचा आकडा कसा पार करू शकत नाही?’’ मला या प्रश्‍नाला आता भिडायचे आहे. मी या सिनेमाकडे एक संधी म्हणून पाहतोय. मराठी सिनेमाकडे पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर प्रत्येक तरुणाने ही कलाकृती चित्रपटगृहात जाऊन पाहावी. ही शिवभक्ती आहे, या भावनेतून त्याचा भाग व्हावे. जेव्हा प्रादेशिक अस्मिता टोकदार आणि प्रगल्भ असते, तेव्हाच इतरांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. ‘नेटफ्लिक्स’वर ‘गेम ऑफ थ्रोन’सारखी मालिका सुपरहिट होते, मग माझ्या राजांवर भव्य-दिव्य जागतिक मालिका, चित्रपट का बनू शकत नाही? तो बनेल, आम्ही बनवू, त्याआधी मराठी बालेकिल्ला मजबूत झाला पाहिजे.

प्रश्‍न : शिवरायांवर चित्रपट बनवण्याचे आव्हान कसे पेलता?

डॉ. कोल्हे : ऐतिहासिक सिनेमाच्या प्रेक्षकांचे चार प्रकार आहेत. ज्याला इतिहास काहीच ठाऊक नाही, हा पहिला प्रकार. ज्याला फक्त पाठ्यपुस्तकातील इतिहास माहिती आहे, हा दुसरा प्रकार. कथा, कादंबरी, व्याख्यानातून इतिहास समजून घेणारा तिसरा प्रकार आणि अगदी इतिहास तोंडपाठ आहे, असा चौथा वर्ग. चित्रपट बनवताना त्यातील मूल्ये चारही घटकांना समोर ठेवून बनवावी लागतात.

प्रश्‍न : राजकारणाचा केंद्रबिंदू व सिनेमाचा विषय हा योगायोग आहे का?

डॉ. कोल्हे : मी मेकअप रूममध्ये चढताना पक्षाचे जोडे बाहेर ठेवतो. मी भूमिकेला न्याय देतो. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. राजकीय व्यासपीठावर सोयीस्कर भूमिका घेता येते. इतिहास मांडताना तसे चालत नाही. तेथे तुमचा हेतू शुद्ध लागतो. देशात इतक्या राजवटी होत्या, मात्र आजही स्वराज्याचे नाव आदरानेच घेतले जाते. त्यामागे शिवराजांचा विचार, नैतिक अधिष्ठान महत्त्वाचे ठरते. त्यांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले आहे, त्यापुढे माझ्यासाठी अन्य कोणतीही खुर्ची गौण आहे.

प्रश्‍न : मंदिरांवरून जातीय भेदाभेद याकडे कसे पाहता?

डॉ. कोल्हे : इतिहास हा भविष्यासाठी प्रेरणादायी ठरावा. द्वेष, अशांती, जातीय, धार्मिक, वांशिक द्वेषभावना यातून विकास आणि रोजगाराचे प्रश्‍न सुटणार आहेत का? हे ज्यांचे प्रश्‍न आहेत, त्या तरुणांनीच हे बोलायला हवं. जिथे असे वातावरण असते, तेथे रोजगार उभे राहत नाहीत आणि राष्ट्रहिताचे विचारही रुजत नाहीत. मुद्दा ‘बायकॉट’चा...अशा विचाराच्या लोकांपेक्षा मला ‘सपोर्ट’ व्यवस्थेवर अधिक विश्‍वास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास चित्रपटरुपाने रसिकांसमोर आणताना नैतिक जबाबदारीचे भान ठेवावे लागते. या विषयाला एका व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्यापलीकडे अनेक आयाम असतात. शिवरायांचा धगधगता इतिहास हा विषय आपण निवडतो, तेव्हा देशभरातील रसिकाने मराठी सिनेमासृष्टीकडे आदराने पाहावे, अशी संधी निर्माण होते. त्यासाठी मराठी मुलखाचा बालेकिल्ला मजबूत करायला मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद मजबूत हवा. शिवरायांवरील चित्रपटाला मराठी माणसाने प्रचंड प्रतिसाद दिला, तरच तो जागतिक दर्जाचा बनवण्याची कवाडे खुली होतील. शिवरायांवरील चित्रपट हिंदी आणि इंग्रजीत बनवण्याचे आमचे स्वप्न आहे, अशी भावना प्रख्यात अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या त्यांच्या नव्या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले.