चिकन गुनिया, ताप, कणकण, सांधेदुखीने सांगलीकर बेजार 

अजित झळके 
Wednesday, 16 September 2020

सांधे दुखणे, बोटे आखडणे, ताप आणि कणकण अशा लक्षणांनी सांगलीतील अनेक लोक बेजार आहेत. ही सारी लक्षणे चिकनगुणिया सारखी आहेत, मात्र तो चिकनगुनिया नाही.

सांगली : सांधे दुखणे, बोटे आखडणे, ताप आणि कणकण अशा लक्षणांनी सांगलीतील अनेक लोक बेजार आहेत. ही सारी लक्षणे चिकनगुणिया सारखी आहेत, मात्र तो चिकनगुनिया नाही. हा आजार नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्‌भवतो, संसर्ग वाढतो, असा दावा डॉक्‍टरांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी सांगलीत महापूर आल्यानंतर अशा पद्धतीच्या आजाराने डोके वर काढले आहे. 

कोरोनाचे संकटाने एवढे घेरले आहे, की इतर आजारांवर बोलायला आता कुणाला वेळ नाही. अनेक डॉक्‍टरांनी दवाखाने बंदच ठेवले आहेत. बड्या रुग्णालयांत कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. परिणामी, अन्य आजारांवर वेळेवर उपचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यात अंगदुखीने बेजार रुग्णांना वेगळीच चिंता लागली आहे. हा आजा नेमका काय आहे, याबाबतच लोक संभ्रमात आहेत. परंतू, गेल्यावर्षीपासून असे रुग्ण आढळून आल्याचे अनेक डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी "स्टेरॉईड' इंजेक्‍शन देण्याचे प्रकार सुरु आहेत. त्याबाबतही सावध राहणे गरजेचे आहे. 

या आजारावर वेदनाशामक औषधे घेतली जातात, मात्र ती टाळलेली बरी, असे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात. त्याऐवजी फिजिओथेरपीच्या माध्यमातून उपचार घेणे योग्य ठरेल. बऱ्याचदा वेदना शमवण्यासाठी उत्तेजक औषधे घेतल्याने किडनी विकार, रक्तदाब, संधी वात वाढणे, चेहऱ्याला सूज असे प्रकार होतात. काहींच्या चेहरा-नाकावर त्वचेवर डाग दिसतात. ते पुढे सहा महिन्यानंतर निघून जातात. त्यासाठी वेगळे औषधोपचार करू नयेत. ही औषधांची ऍलर्जी आहे. त्यामुळे पुन्हा तीच औषधे घेतेवेळी ती टाळली पाहिजे. त्यासाठी डॉक्‍टरांना पुर्वकल्पना दिली पाहिजे, अशा सूचना डॉ. बिंदूसार पलंगे यांनी दिल्या. 

तपासणीची अडचण 
ग्रामीण भागातील आरोग्याचा डोलारा आजही प्राथमिक आरोग्य केंद्रावर उभा आहे. तेथे रक्ताचे नमुने घेऊन मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवले जात होते. तेथे चिकनगुणियाची तपासणी व्हायची, मात्र आता त्याच प्रयोगशाळेत कोविड तपासण्या सुरु आहेत. त्या अत्यावश्‍यक आहेत. त्यामुळे अन्य तपासण्या पूर्ण थांबल्या आहेत. परिणामी, चिकनगुणिया, डेंग्यू या साथीकडे फारसे लक्षच नसल्याची स्थिती आहे. 

लक्षणे काय? 
* हाडाचे सांधे दुखणे 
* अंगात प्रचंड वेदना 
* काम करताना हाताची बोटे दुखणे 
* अशक्तपणा, ताप 
* नाकावर काळे व्रण दिसणे 

चिकनगुनिया हे विषाणूचे नाव आहे. विषाणू संसर्गामध्ये ताप येणे, सांधे दुखणे, सर्दी येणे अशी लक्षणे दिसतात. ती सारखीच असतात. नैसर्गिक आपत्तीमुळे विषाणू संसर्ग होतो. यामध्ये उपचार म्हणजे शरीरातील विषाणू संख्या कमी करणे आणि रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूला कमीत कमी इजा होईल या दृष्टीने औषधोपचार करणे. औषधोपचारानंतरही सहा महिन्यांपर्यंत सांधेदुखी कायम राहते.
- डॉ. बिंदुसार पलंगे, एम. डी. मेडीसीन 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken pox, fever, granules, joint pains Sanglikar bejar