मुख्यमंत्र्यांनी केली त्यांची विचारपूस, अन काय दिला प्रेमळ सल्ला?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला

इस्लामपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिव्हाळ्याने विचारपूस करत जनतेच्या सेवेत कार्यरत राहण्याचा प्रेमळ आदेश देत स्वतःची, शिवसैनिकांची आणि सर्वांचीच काळजी घेण्याचे आवाहन केले. 

माहिती देत असताना आनंदराव पवार यांनी सांगितले,"23 मार्चला इस्लामपुरात 4 कोरोनाचे रुग्ण सापडले. एकट्या इस्लामपूर शहरातच 26 रुग्ण झाले. प्रशासनाच्या माध्यमातून इस्लामपूर शहरातील परिस्थिती सुधारते तोपर्यंत जिल्हाभर कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. आजअखेर एकूण कोरोना चाचणी 2200 पैकी 86 रुग्ण बाधित, 46 रुग्ण बरे झाले, 34 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, 3 रुग्ण चिंताजनक असून 2 रुग्ण मृत झाले आहेत.

जिल्हा प्रशासन, पोलिस अधिकारी, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पालिका प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र काम करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत अन्नधान्य, जीवनावश्‍यक वस्तू, मास्क सॅनिटायझरचे वाटप केले. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत भोजन व्यवस्था परप्रांतीय व भटक्‍या लोकांना, तसेच गरजू लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरपोच जेवण दिले.'' 

जिल्ह्यतील कोरोना रुग्णांसाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मागणी केल्यानुसार मिशन हॉस्पिटल मिरज साठी पीपीई कीट्‌स 5000, एन95 मास्क 2000, व्हेंटिलेटर 10, मॉनिटर 14 अशा साहित्यांची पूर्तता करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांना आनंदराव पवार यांनी विनंती केली. संबंधित विभागाला सूचना देऊन लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. दर आठवड्याला व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Minister asked and gave them advice