मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रवादीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच....

मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रवादीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच....

इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा) येथील सभेत दिला. येत्या पाच वर्षात भाजप सरकार एक कोटी रोजगार निर्माण करेल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल, असेही ते म्हणाले.

मंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, गौरव नायकवडी, उदयसिंह नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "देशमुखांनी राजकारण करताना कामातून वेगळा ठसा उमटवला. तत्वांचे राजकारण, समाजकारण केले. सरकार जरूर त्यांचे स्मारक उभारेल. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने त्यांना अपमानित केले, त्याला न्याय देण्यासाठी त्याच सभागृहात सत्यजितना पाठवून अपमानाचा बदला घेतला जाईल."

फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत. त्यातून आमचाच फायदा होतोय. शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. आधे इधर, आधे इधर बचे मेरे साथ आव किंवा इस दिल के टूकडे हजार हुये, कोई यहा गिरा, कोई वहा गिरा अशी अवस्था आहे. आमचे सरकार सर्व स्तरातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवत आले आहे. समस्या सगळ्या संपल्या नाहीत पण काँग्रेस राष्ट्रवादीने जे 15 वर्षात केले नाही ते आम्ही पाच वर्षात दुप्पट काम केले आहे. त्यांचे काम 15 तर आमचे पाच पट जास्त आहे. काही कामे वीस, तीस, चाळीस पट जास्त आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली. 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे भरले. शेवटच्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत योजना सुरूच राहील. शेतकऱ्याला प्रत्येक अडचणीत मदत केली. काँग्रेस - राष्ट्रवादीने 15 वर्षात शेतकऱ्यांना 20 हजार कोटी दिले, आम्ही 5 वर्षात शेतकऱ्यांना 50 हजार कोटी दिले. वर्षाला 10 हजार कोटी दिले. शेतीला पाणी, सिंचन व्यवस्था व्हावी यासाठी मोठा निधी दिला. शिवाजीराव नाईक यांनी मंत्रिपद, महामंडळ नको पण वाकुर्डेच्या निधीसाठी पाठपुरावा केला. आम्ही वाकुर्डे योजनेला 350 कोटी दिले. त्याची कामे सुरू आहेत, दिवाळीनंतर पाणी पोहचुन सुमारे 45 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पैसा दिला. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांना गती दिली. या भागातील डझनभर मंत्र्यांनी जे केले नाही ते युती सरकारने केले. महापुराचे प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील गावांना जागतिक बँकेच्या मदतीने देणार आहे. तीस हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते केले, 18 हजार गावात पिण्याचे पाणी नेले. शासकीय जागा, गायरानातील अतिक्रमण नियमित करून तीन लाख लोकांना दिलासा दिला. झोपडपट्टीधारकांनाही मालकी हक्काचा पट्टा देतोय. ग्रामीण व नागरी भागात 7 लाख घरे बांधली, अजून 10 लाख बांधली जातायत. मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणले आहे. सामान्य माणसाला ताकद देणारे राजकारण करत आहोत. आमच्या जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि 1 कोटी लोकांना रोजगार देण्याचा शब्द सार्थ ठरवू. सरकार आपलेच येणाराय, शिराळा मतदारसंघाच्या विकासाच्या सर्व मागण्या मार्गी लावू. नवा महाराष्ट्र, भारत आपण घडवतोय. त्यात सामान्य माणसांचा विकास आहे."

आमदार शिवाजीराव नाईक यांनी विकासाचे मुद्दे मांडले. सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये येण्याचे कारण मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आणि शरद पवार यांनी वडिलांना अपमानास्पद वागणूक देऊन पदावरून घालवले त्या रागापोटी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

डबल इंजिन सुसाट धावेल...
शिवाजीराव पुन्हा निवडून येतील, जोडीला सत्यजित आहेतच, येत्या काळात ही डबल इंजिनची गाडी शिराळाच्या डोंगराळ भागाचा सुसाट वेगाने विकास करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

साडूचे जयंतरावांना प्रत्त्युत्तर !
"माझ्या पाहुण्याचे प्रेम अलीकडे जास्तच उतू जायला लागलंय, मला जर भाजपने जवळ केलं असेल आणि माझे भले होणार असेल तर त्यांच्या पोटात दुखायचं कारण नाही. आता हा छोटा साडू तुमचे आव्हान पेलून दाखवेल, या शब्दात सत्यजित देशमुख यांनी आमदार जयंत पाटील यांना प्रत्त्युत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com