
जतच्या पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री नक्की सोडवतील. आम्ही यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.
जत (जि. सांगली) : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना जतच्या शेतकऱ्यांच्या भेटीला पाठवून, त्यांना मदतीचा हात दिला होता. आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सुदैवाने मुख्यमंत्री ही उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे जतच्या पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री नक्की सोडवतील. आम्ही यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.
राज्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना एकाच अर्जावर शेतीच्या सर्व उपाययोजनाचा लाभ घेता येणार आहे. शेतीत रासायनिक औषधाचा वापर टाळण्यासाठी गाव पातळीवर ग्राम कृषी समिती स्थापन करण्यात येणार आहे, असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. आमदार विक्रमसिंह सावंत व विक्रम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "माळरान कृषी, पशु प्रदर्शन व कृषी सन्मान' सोहळ्याचे उद्घाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर या होत्या. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थिती आमदार विक्रमसिंह सावंत यांचा सत्कार मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, विभागीय संचालक एच. एम. कदम, कर्नल भगतसिंह देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर, विक्रम शिंदे, सौ. मीनलताई सावंत - पाटील, सुजय शिंदे, युवराज निकम, सभापती नामदेव काळे, नगरसेवक इराण्णा निडोणी, निलेश बामणे, विकास माने, परशुराम मोरे, दिलीप सोलापूरे, आदीसह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री ऍड. ठाकूर म्हणाल्या, तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला असून तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. यासाठी आपण प्रयत्न करू. स्व. पतंगराव कदम यांनी जत गाव दत्तक घेतले होते. जतसाठी विकासाची दारे खुली केली. आज आमदार विक्रम सावंत कदम साहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांना बळ देऊ, येणाऱ्या काळात अंगणवाडी सीडीपीओ कशी होईल, यातून सेविकांचे पगार वेळेत कसे होतील, याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जत तालुक्याशी कदम घराण्याचे वेगळे नाते आहे. येथील दुष्काळ जवळून अनुभवता आला, पाण्याअभावी येथील शेतकरी पुणे, मुंबईला कामाच्या शोधात बाहेर पडला. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची आहे.
येथील शेतकऱ्यांना पाणी मिळाले, तर राज्यात शेती उत्पादन जत तालुका अग्रेसर असेल. आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्यासाठी तालुक्याने 42 वर्षे गेली. अवघे दहा टक्केच क्षेत्र ओलीताखाली आले. आता म्हैसाळ विस्तारीत योजनेला बळ दिले जात आहे. याला आमचाही पाठपुरावा असेल. मात्र, यासाठी आणखी 42 वर्षे जाऊ नये, हीच अपेक्षा. वंचित 52 गावांना पाणी मिळावे, यासाठी पावसाच्या पाण्याने तलाव भरून द्यावे, तालुक्याचे विभाजन करावे, सर्व शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याची जागा भरावे व तालुक्यात कृषी महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी केली.
नेत्यांचा पक्ष प्रवेश
तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर विश्वास ठेवून अनेक नेत्यांसह, कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये बसपच्या चिन्हावर निवडून आलेले शिक्षण व क्रीडा सभापती भुपेंद्र कांबळे, मुचंडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे नेते मारूती पवार, युवा नेते राजू यादव या प्रमुख नेत्यांनी कॉंग्रेस पक्ष प्रवेश केला.
संपादन : युवराज यादव