सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या थैमानात आता चिकनगुनियाची भर

अजित झळके 
Saturday, 29 August 2020

एकीकडे कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात चिकुनगुनियाची साथ वेगाने पसरायला लागली आहे. महापालिका क्षेत्रासह गाव, खेड्यांत रुग्ण आढळू लागले आहेत.

सांगली : एकीकडे कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात चिकुनगुनियाची साथ वेगाने पसरायला लागली आहे. महापालिका क्षेत्रासह गाव, खेड्यांत रुग्ण आढळू लागले आहेत. गंभीर बाब म्हणजे या रुग्णांना तपासण्यासाठी आणि औषधोपचारासाठी पुरेसी वैद्यकीय सेवाच उपलब्ध नाही. त्यामुळे सारे लोक हैराण झाले आहेत. 

जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात चिकुनगुनियाचे किती रुग्ण आहेत, याची अधिकृत आकडेवारी तूर्त वैद्यकीय यंत्रणेकडे नाही. या सर्व व्यवस्थेचे संपूर्ण लक्ष या घडीला कोरोना नियंत्रणाकडे लागलेले आहे. अशावेळी साथीच्या या गंभीर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची मात्र अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांना कोविडची सुविधा उपलब्ध केले आहे. तेथे अन्य तपासण्या जवळपास थांबल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत, अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. प्रचंड अंगदुखी, थांबून थांबून ताप येणे अशा लक्षणाने लोक बेजार आहेत. 

जिल्हा परिषदेकडून या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. आता सध्या तेथे कोरोनाची चाचणी सुरू असल्याने या तपासण्या जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे आकडेवारी उपलब्ध नसली तरी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात शहरी भागातही रुग्णसंख्या मोठी आहे. वसंतदादा शासकीय रुग्णालयात दररोज नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठीही खाटा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. 
या परिस्थितीत डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर झाले पाहिजे. नागरिकांनी घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. या गंभीर परिस्थितीत आजारी पडणे परवडणारे नाही. वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. त्या कोलमडल्या आहेत. त्यामुळे चिकुनगुनियाच्या अनेक रुग्णांवर घरीच उपचाराची वेळ आली आहे. 

हे करावे... 
* पाणी साचून राहणार नाही याची दक्षता 
* आठवड्यातून कोरडा दिवस पाळावा 
* डास नियंत्रणाच्या उपाययोजना 
* टायरी, टाकावू वस्तू साचू न देणे 
* पाणीसाठे झाकून ठेवणे 

प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व्हे सुरू आहे. त्यातून समोर आलेल्या रुग्णांवर उपचाराबाबत खबरदारी घेतली जात आहे. डास नियंत्रणासाठीही काम सुरू आहे. या घडीला लोकांनी आपली काळजी घ्यावी. पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. डेंगी, चिकुनगुनियापासून बचाव महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतीने या काळात अधिक खबरदारी घ्यावी. 
- डॉ. शुभांगी अधटराव, जिल्हा हिवताप अधिकारी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chikungunya is now added to the corona thaman in Sangli district