भेळ विक्रेत्या वडीलांच्या रिक्षाखाली सापडून चिमुकल्याचा अंत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

स्वतःच्याच रिक्षा खाली सापडून त्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्यांनी जवळ जाऊन त्याला कवटाळले. बेटा कुछ नही होगा तुझे...म्हणत त्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न सुरू केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच एकुलता एक लाडका "चेतन' गेल्याचे त्याच्या आई-वडीलांना समजले.

कोल्हापूर - "पपा, पप्पा ओरडत चिमुकला "चेतन' भेळ विक्रेत्या वडीलांच्या पाठी लागला. ते मात्र साहित्य रिक्षातून हात गाडीपर्यंत नेण्याच्या घाईत होते. रिक्षा पाच फूट ही अंतर पुढे गेली नसेल तो पर्यंत त्याच्या वडीलांच्या कानावर "चेतन बेटा, बेटा... अशा मोठ्या किंकाळ्या पडल्या. त्या किंकाळ्या त्यांच्या पत्नीच्याच होत्या. त्यांनी जागेवर रिक्षा थांबवली. मागे वळून पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. स्वतःच्याच रिक्षा खाली सापडून त्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्यांनी जवळ जाऊन त्याला कवटाळले. बेटा कुछ नही होगा तुझे...म्हणत त्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न सुरू केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच एकुलता एक लाडका "चेतन' गेल्याचे त्याच्या आई-वडीलांना समजले. तसा त्यांनी हंबरडा फोडला.

त्यांना सावरणाऱ्या शेजारी, मित्रपरिवारांच्या डोळ्यातही अश्रुच्या धारा लागल्या. मन सुन्न करणारी ही घटना आज दुपारी सीपीआरने अनुभवली. चेतन कमलेश डांगी (रा. नागांव, हातकणंगले) असे अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचे नांव आहे. 

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती, कमलेश डांगी हे गेली 15 वर्षे नागांव येथे राहतात. ते मुळचे चितोडगड, राज्यस्थानचे आहेत. शिरोलीत भेळ विक्रीचा व्यवसाय करून त्यांनी स्वतःच घर घेतले. तीन वर्षापूर्वी त्यांनी दीपा नावाच्या मुलीशी लग्न केले. त्यांना दीड वर्षापूर्वी मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी "चेतन' ठेवले. आज दुपारी कमलेश यांनी घरी जेवण केले. त्यानंतर त्यांनी भेळच्या गाडीवर लागणारे साहित्य रिक्षात भरले. तसे ते रिक्षा घेऊन शिरोलीतील गाडीकडे जाण्यासाठी बाहेर पडले. तेवढ्यात घरातून चेतन पप्पा पप्पा असे ओरडत त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागे लागला. त्याला धरण्यासाठी त्याची आईही पाठीमागे धावली. मात्र मोठा अनर्थ घडला, चेतन रिक्षाच्या पाठीमागील भागात सापडून गंभीर जखमी झाला. त्याला पाहून तिची आई जोरजोराने ओरडली. तिचे ओरडणे ऐकून कमलेश यांनी जागेवर रिक्षा थांबवली. खाली उतरल्यानंतर त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. कारण त्यांचा लाडका "चेतन' रिक्षात सापडून गंभीर जखमी झाला होता. तिला तिच्या आईने (दीपा) ने कवटाळले होते. ते धावत त्याच्या जवळ पोहचले.

दरम्यान त्याच्या आईचे ओरड्याने शेजारी तेथे जमा झाले. त्याच्या आई - वडीलांनी क्षणाचाही विलंब न लावता शेजाराच्या मदतीने चेतनला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र जे व्हायला नको तेच झाले. चेतन सर्वांना सोडून खूप दूर गेल्याची वाईट बातमी शेजाऱ्यांनी काळजावर दगड ठेऊन त्याच्या आई-वडीलांना दिली. एकुलत्या एक मुलाच्या अशा जाण्याने त्याच्या आई-वडीलांनी मोठा आक्रोश केला. हा प्रसंग पाहून शेजाऱ्यांच्याही अश्रु लपवता आले नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child death in an accident in Nagav Kolhapur