
शासनाने दिलेले वितभर शेत आणि हातभर जागेत रहायचे कसे? जगायचे कसं? असा प्रश्न घेऊन शामराव धनाजी सावंत आणि त्यांची पत्नी तानूबाई हे धरणग्रस्त दांपत्य सन 1997 मध्ये येथे उतरले. पदरात सहा चिमुकली पोरं.
वाळवा : शासनाने दिलेले वितभर शेत आणि हातभर जागेत रहायचे कसे? जगायचे कसं? असा प्रश्न घेऊन शामराव धनाजी सावंत आणि त्यांची पत्नी तानूबाई हे धरणग्रस्त दांपत्य सन 1997 मध्ये येथे उतरले. पदरात सहा चिमुकली पोरं. गाव नवं, हात रिकामे, मग पोट भरण्यासाठी वाट्याला आली मजुरी. जोडपं मजुरी करू लागलं; पण सहाही मुलांच्या शाळेकडे दुर्लक्ष केले नाही.
सावंत दांपत्याला पाच मुले आणि एक मुलगी. शाळा शिकतही ही भावंडे शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावायची. या मुलांत चिवटपण मुरलेला होता. या पाच खो-खो पटूंनी शाळा, गाव, जिल्हा, राज्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा किसन अहिर विद्यालयात मुलांनी माध्यमिक शिक्षण घेतले. शाळेच्या खो-खो संघाचा राज्यभर त्या काळात दबाव होता. संघांत नरेश, लक्ष्मण, रामचंद्र, सुरेश आणि गौरी ही सावंत दांपत्याची मुले सहभागी झाली.
आज सावंत यांच्या घरात मुलांनी खो-खो स्पर्धेत मिळवलेली पदके ठेवायला जागा नाही. नरेशला राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले. सुरेश लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धा जिंकून आला. रामचंद्र, लक्ष्मण 10-15 राष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळून छोट्या व्यवसायात आहेत. गौरीही दहा राष्ट्रीय स्पर्धा खेळून घरी शिवणकाम करते. नरेशला महावितरणने नोकरी दिली आहे. बाकी अजून संघर्ष करीत आहेत. खो-खोची मैदाने सातासमुद्रापार गाजवणा-या मुलांचा सावंत दांपत्याला अभिमान आहे. धरणग्रस्त म्हणून मिळणारा पुनर्वसनासाठी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे मुलांची शौर्यगाथा रोजच्या लढाईत वेगळी ऊर्जा देते आहे. सावंत कुटुंबाला आजही मजुरीशिवाय पर्याय नाही. थकून घरात गेले, की सुवर्ण, रौप्य, कास्य आणि इतर पदकांची गर्दी पाहून शिण निघून जातो.
अण्णांचा अंदाज खरा ठरला :
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी खो-खोला प्रोत्साहन दिले. सन 2003 मध्ये सावंत बंधूचा सहभाग असलेल्या हुतात्माच्या संघाने जिल्हा स्पर्धा गाजवली. सावंत भावंडांचा खेळ पाहून अण्णांनी ही पोरं देश गाजवतील, असे म्हटले होते. सन 2013 मध्ये सावंत बंधूंनी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा गाजवून अण्णांचा अंदाज खरा ठरवला.
संपादन : प्रफुल्ल सुतार