Marathi Rajbhasha Din बालसाहित्यिकांचा नगरमध्ये भरला कुंभमेळा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने कडू बोलत होते. 

नगर ः आनंदऋषी महाराज, साईबाबा, रामदास स्वामी, संत मीराबाई, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असलेल्या ग्रंथदिंडीचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. "लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी' या मराठी भाषा अभिमान गीतावर विद्यार्थ्यांनी ताल धरला. 

आपलेपणाची भावना हवी 
""बालसाहित्याचे लेखन करताना लेखकांनी आपल्या सभोवतालचे भान ठेवावे. आपलेपणाची भावना निर्माण करणारे साहित्य लिहावे,'' असे आवाहन ज्येष्ठ बालसाहित्यिक, चित्रकार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ल. म. कडू यांनी केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष या नात्याने कडू बोलत होते. 

दीपप्रज्वलनाने संमेलनाचे शानदार उद्‌घाटन झाले. स्वागताध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, महापौर बाबासाहेब वाकळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, शीतल जगताप, मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 

अवडंबर करू नका 
कडू म्हणाले, ""विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषेची पालखी वाहणारे असंख्य भोई या ठिकाणी उपस्थित आहेत. इंग्रजी भाषा हे वाघिणीचे दूध आहे, तर मराठी भाषा हे आईचे दूध आहे. इंग्रजी भाषा शिकणे गरजेचे आहे; मात्र तिचे अवडंबर करू नका.'' 

वाचनसंस्कृतीसाठी मसाप उपक्रम 
फिरोदिया म्हणाले, ""नगर जिल्ह्याला अनेक मोठ्या साहित्यिकांची देण आहे. वाचनसंस्कृती वाढण्यासाठी मसाप सावेडी उपनगर शाखेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.'' 

सर्वांनी मराठीतूनच बोलावं

डॉ. संजय कळमकर म्हणाले, ""मराठी राजभाषा दिनानिमित्त आपली आई असणाऱ्या मराठी भाषेचा वाढदिवस साजरा करीत आहोत. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी मराठीतूनच बोलले पाहिजे. मराठी भाषा आपल्या हृदयातून उमटते. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून द्यावा. सर्व परिपत्रके मराठी भाषेतूनच काढावीत.'' 

उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर, महापौर बाबासाहेब वाकळे, शीतल जगताप यांचीही भाषणे झाली. उत्कृष्ट बालवक्ता स्वयम शिंदे, जिच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक होत आहे, ती सात्रळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी श्रेया सजन, मुग्धा घेवरीकर व राधिका वराडे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

"लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात प्रा. शशिकांत शिंदे यांच्याशी स्नेहल उपाध्ये यांनी संवाद साधला. बक्षीस वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. जयंत येलूलकर यांनी प्रास्ताविक केले. शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष पवार यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children's Literature Conference in Ahmednagar