राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या "तासगाव'चे धुराडे सात वर्षानंतर पेटणार 

रवींद्र माने 
Saturday, 25 July 2020

तासगाव तालुक्‍यातील राजकारणाचा कित्येक वर्षे केंद्रबिंदू असलेला तासगाव पलूस साखर कारखान्याचे धुराडे सात वर्षांनंतर पुन्हा एकदा पेटणार आहे.

तासगाव : तासगाव तालुक्‍यातील राजकारणाचा कित्येक वर्षे केंद्रबिंदू असलेला तासगाव पलूस साखर कारखान्याचे धुराडे सात वर्षांनंतर पुन्हा एकदा पेटणार आहे. मालकी बदलली असली तरी नाव मात्र कायम ठेवण्यात येणार असल्याने कही खुशी कही गम अशा काहीशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 
राजकीय वाद आणि राजकारणामुळे जिल्ह्यात तासगाव कारखान्याची ओळख आहे. तासगाव आणि पलूस तालुक्‍यातील राजकारणाचे खूप पाणी कारखान्याच्या पुलाखालून वाहिले. कारखान्याचे संस्थापक असलेले कै दिनकर आबा पाटील, कै आर आर आबा पाटील आणि कै डॉ पतंगराव कदम यांची हयातीची अनेक वर्षे या कारखान्याभोवती गेली. तर खासदार संजय पाटील यांच्या राजकारणाला अनेक पैलू याच कारखान्याने पाडले. 

तासगाव कारखान्याने 1988 ला स्थापनेनंतर अनेक स्थित्यंतरे पाहिली, सुरुवातीपासून कारखाना तोट्यात गेल्याने कारखाना राज्य सहकारी बॅंकेने ताब्यात घेतला. त्यावर प्रशासक नेमण्यात आला. प्रशासकाच्या काळात चक्क कामगारांनी कारखाना चालविला. नंतर राज्य सहकारी बॅंकेने अवसायक नेमून कारखाना खाजगी तत्वावर उगार शुगर्स या कंपनीला चालवायला दिला. त्यांच्याकडून कारखाना 2007 मध्ये गणपती जिल्हा सहकारी संघाला चालविण्यास देण्यात आला. पुढे खासदार संजय पाटील यांनी हा कारखाना विकत घेतला.

मात्र हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले आणि आता ती प्रकिया पूर्ण होऊन आता कारखाना श्री गणपती जिल्हा संघ आणि श्री गणपती ऍग्रो (जी ए)यांच्याकरवी पुन्हा एकदा सुरू होत आहे. सन 2012-2013 च्या हंगामनंतर सात वर्षाने पुन्हा एकदा कारखान्याचे धुराडे आता पेटणार आहे. आरफळ, ताकारी, म्हैशाळ, विसापूर पुनदी या योजनांमुळे ऊस शेती तासगाव तालुकायत खूप वाढत आहे. गेल्यावर्षी अनेकांचा ऊस गाळपा अभावी शेतातच राहिला त्यापार्श्वभूमीवर कारखाना सभासदांच्या मालकीचा ? का खाजगी ? यापेक्षा तो सुरू झाला हे मह्त्वाचे ! 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The chimney of "Tasgaon", will burn after seven years