45 तासानंतर चिमुरडीचा मृतदेह सापडला ः पहा कोठे

untitled 1.png
untitled 1.png

इस्लामपूर, (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून वाहून गेलेल्या पाच वर्षीय जेनिषा भावर पोरवाल या चिमुरडीचा मृतदेह आज दुपारी सापडला आहे. सुमारे 45 हुन अधिक तास तिची शोधमोहीम सुरू होती. ही घटना बुधवारी दुपारी (ता.24) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली होती. आज तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह हाती लागला.

इस्लामपूर शहरातील काही महिलांनी एकत्र येऊन येथे बहे नदीकाठी असलेल्या रामलिंग बेटावर ट्रिप काढली होती. ती ट्रीप या चिमुकलीच्या जीवावर बेतली. तब्बल 2 दिवसांनी नदीपात्रातील झुडपात सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. बुधवारी कृष्णा नदीच्या पात्रातून ही 5 वर्षांची चिमुरडी वाहून गेली होती.

रामलिंग बेटावर खेळणारी मुलगी महिलांच्या डोळ्यादेखत जोरदार पाण्याच्या प्रवाहातून वाहत गेली होती. आज दुपारी बोरगाव (ता. वाळवा) येथून बोट घेत तरुणांनी शोधकार्य सुरू केले होते. यात त्याच दिवशी जेनिषाच्या पाठीवर अडकवलेली कपडे असलेली सॅक सापडली होती. तीन बोटी रेस्क्‍यू टीमसह आज सलग तिसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरू होती. नगरसेवक अमित ओसवाल, माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी कृष्णा नदीकाठावरील संबंधितांना माहिती देत सतर्कता म्हणून नदीकाठी शोध मोहीम राबवली होती.

जेनिषाचा शोध घेण्यासाठी इस्लामपुरातील तीसहुन अधिक तरुण पोलिसांच्या मदतीने शोधकार्य करीत होते. शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसामुळे आज शोधकार्य उशिरा सुरू झाले. बोरगाव, खरातवाडी येथील नदीपात्रात शोधकार्य राबवले होते. पोरवाल कुटूंबाचे लाल चौक परिसरातील कन्या शाळेजवळ शालिमार कापड दुकान आहे.

या कुटुंबातील महिलांसह परिसरातील आठ-दहा महिला एकत्रित येऊन रामलिंग बेट परिसरात छोटी ट्रिप काढली होती. बेटावर फिरण्याठी गेल्यावर सायंकाळी साडे चारच्या सुमारास मंदिर परिसरात असणाऱ्या हेलिपॅडजवळ सर्व महिला एकत्रित आल्या होत्या. यावेळी खेळत असणारी जेनिषा नदीच्या पात्रात पडली. तिने आरडाओरडा केला. पाण्यात मुलगी गटांगळ्या खात होती.

पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती प्रवाहासंगे वाहून गेली. डोळ्यासमोर मुलगी वाहून गेल्याने आईने आक्रोश केला. महिलांनी आरडाओरडा केला पण काहीच उपयोग झाला नाही. इस्लामपूर शहरातील लाल चौक, गांधी चौक परिसरातील तरुणांनीं रामलिंग बेटावर धाव घेतली होती. जेनिषा ही येथील विद्यानिकेतन स्कूलमध्ये युकेजीच्या वर्गात शिकत होती.
--------------------
सांगलीच्या रेस्क्‍यू फोर्सची मदत
सांगली येथील स्पेशल रेस्क्‍यू फोर्स राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखालील तरुणांनी मृतदेह बाहेर काढला. गजानन नरळे, कैलास वडर, महेश गवणे, अंकुश घोरपडे, दिगंबर हिप्परकर, ज्ञानेश्वर नरळे, प्रतिक जामदार, सागर निकम, सुरज जामदार यांचा त्यात सहभाग होता. या रॉयल कृष्णा बोट क्‍लबसह नगरसेवक कपिल ओसवाल आणि अमित ओसवाल यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते गेले तीन दिवस अहोरात्र झटत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com