esakal | कोगनोळी टोलनाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपूल; ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

 कोगनोळी टोलनाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपूल

कोगनोळी टोलनाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपूल

sakal_logo
By
अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी (कोल्हापूर) : राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण आणि आरटीओ चेक पोस्टनाका बांधण्यासाठी पडलेल्या मोठ्या भरावामुळे कागल परिसरातील दूधगंगा नदी काठाच्या गावांना दरवर्षी महापुराला सामोरे जावे लागत आहे. यातच आता कर्नाटक हद्दीत कोगनोळी टोलनाक्यापासून दुधगंगा नदीपर्यंत वर्तुळाकार उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याने पुराच्या धोक्यामध्ये आणखी वाढ होणार आहे.परिणामी ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महामार्गाला सोडून स्वतंत्र पद्धतीने हा उड्डाणपूल होणार असल्याने पुन्हा नव्या भरावामुळे करनूर, वंदूर या गावांना दुधगंगा नदीच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कोगनोळी गावच्या हद्दीतील 20 ते 35 एकर पिकाऊ शेतजमीन व 40 ते 50 व्यावसायिकांना फटका बसणार आहे. कागल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये या उड्डाणपुलामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व कर्नाटक शासनाच्या वतीने हा उड्डाणपूल उभारण्यासाठी उपग्रह सॅटेलाईटद्वारे सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच जमीन संपादन करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत कुणकुण लागल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व एनएचएआयकडे तक्रार केली आहे. तर पुराच्या धास्तीने कागल, करनूर, वंदूर, शंकरवाडी, सिद्धनेर्ली गावाच्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कृती समिती तयार केली आहे.

सहा पदरीकरण महामार्ग आणि सर्व्हिस रस्ते यासाठी भरपूर जागा दोन्ही बाजूस शिल्लक असताना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेला लागून हा उड्डाणपूल कशासाठी, हा प्रश्न समोर आला आहे. वळसा घालून उड्डाणपूल महामार्गाला मिळणार कोगनोळी गावच्या जवाहर कारखान्याच्या ऑफिसपासून उड्डाणपूलाची सुरुवात होईल. कोगनोळी फाट्यावर महामार्गावरून करनूरकडे जाणाऱ्या बाबासाहेब पाणंद येथून वळसा घालून जयसिंग पवार यांच्या घराजवळून दूधगंगा नदीजवळ जाऊन महामार्गाला मिळणार आहे. कोगनोळीकडील बाजूला सरळ पुल आहे. त्यासाठी मोठे बांधकाम होणार आहे.

सध्या दूधगंगा नदीचे पाणी घरापर्यंत येत आहे. शेती पाण्याखाली जात आहे. आता नवीन उड्डाणपूल झाल्यावर काय अवस्था होईल, सांगता येत नाही. शेतकरीवर्गाची 50 ते 60 एकर जमीन या प्रकल्पामुळे जाणार आहे. अनेकांची घरे यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे पुलाबाबत फेरविचार करावा.

-सुनील माने,ग्रा. पं. सदस्य, कोगनोळी

शासनाकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे उ़ड्डाण पुलाची योजना आखली जाईल. सध्या फक्त नकाशे आले आहेत‌.

-कमलेश, सहाय्यक अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बेळगाव

loading image
go to top