मास्कबाबत नागरिकांचा हलगर्जीपणा; पोलिसांच्या जिवाशी पुन्हा खेळ... वाचा काय झाले

अजित झळके
Wednesday, 9 September 2020

सांगली, मिरजसह जिल्ह्यातील शहरांमध्ये पोलिसांना चौकाचौकात उभे राहून आता मास्कसाठी नाकाबंदी करण्याची वेळ आली. लोकांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा हा परिणाम.

सांगली ः सांगली, मिरजसह जिल्ह्यातील शहरांमध्ये पोलिसांना चौकाचौकात उभे राहून आता मास्कसाठी नाकाबंदी करण्याची वेळ आली. कोरोना संकट काळात प्रचंड गतीने वाढणारे रुग्ण आटोक्‍यात आणण्यासाठी हा प्रयत्न सुरू झाला आहे. लोकांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा हा परिणाम. अशा कारणासाठी नाकाबंदी करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. 

मिरज तांदूळ मार्केटमध्ये आज सकाळी एक वाहतूक नियंत्रक पोलिस आणि एक होमगार्ड उभे होते. होमगार्डने पोलिसाला विचारले, ""मास्क न लावलेल्या सर्वांना अडवू का?'' त्यावर पोलिस म्हणाले, ""तू एकटा किती करणार आहेस? लोकांना कळत नसेल तर जाऊ देत... कोरोना झाल्याशिवाय अक्कल येणार नाही, अशा लोकांना.'' ही हतबल प्रतिक्रिया सध्या पोलिसांतील प्रत्येकाची आहे. पोलिसांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.

पहिल्या टप्प्यात सांगलीसह जिल्ह्यातील 20 हून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा बाधित आहेत. अशावेळी पुन्हा एकदा पोलिसांची परीक्षा सुरू झाली आहे. या संकट काळात एकमेकापासून अंतर ठेवणे, मास्क वापरणे ही साऱ्यांची जबाबदारी आहे. पोलिसांना मात्र मास्क नसणाऱ्यांना अडवायचे, त्याला दम द्यायचा, त्याच्याकडून दंड वसूल करायचा, असे काम लागले आहे. 

लोक अत्यंत बेसावध आहेत. "माझी प्रतिकार शक्ती फार भारी आहे', असा अतिआत्मविश्वास काहीजणांना आहे. त्यामुळे ते बिनधास्त फिरत आहेत. ना मास्कचा वापर, ना सॅनिटायझर... हे सारे "खतरों के खिलाडी' ठरत आहेत. त्यामुळेच मास्कसारख्या विषयासाठी नाकाबंदी करण्याची वेळ आली आहे. सांगली, मिरजेत जागोजागी तपासणी सुरू आहे. काही ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नाकाबंदी करत आहेत. गंभीर बाब म्हणजे, मास्क न लावता फिरणारे त्यांच्याशी वाद घालत आहेत. हे सारे कुणासाठी सुरू आहे, याचे भानही लोकांना राहिलेले नाही. 

मावा खाऊन पिचकाऱ्या 
सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सर्वत्र मावा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या "पिचकारी टोळ्या' सैराट झाल्या आहेत. त्यांच्याबाबत कडक भूमिका घ्यावी आणि मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडूनही दंड वसूल करावा, अशी मागणी आता पुढे आली आहे.

संपादन- युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens' negligence about masks; police checking strictly again in Sangali