पाचवी ते आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज; उद्यापासून सुरू

अजित झळके
Tuesday, 26 January 2021

कोरोना संकटात तब्बल दहा महिने खंड पडलेल्या शिक्षण व्यवस्थेच्या पुनःश्‍च प्रारंभाचा दुसरा टप्पा बुधवार (ता. 27) पासून सुरू होत आहे.

सांगली ः कोरोना संकटात तब्बल दहा महिने खंड पडलेल्या शिक्षण व्यवस्थेच्या पुनःश्‍च प्रारंभाचा दुसरा टप्पा बुधवार (ता. 27) पासून सुरू होत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरणार आहे. त्यासाठीची संपूर्ण व्यवस्था तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

पालक बैठका घेऊन खबरदारीच्या संपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे संमतीपत्र घेण्यात आले आहे. दीर्घकाळ एक तर शिक्षण व्यवस्थेपासून दूर राहिलेल्या किंवा ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मित्र-मैत्रिणींना भेटता येणार आहे आणि प्रत्यक्ष शिक्षणाला गती येणार आहे.

जिल्ह्यातील शाळा 15 मार्चला बंद झाल्या होत्या. या काळात मोजक्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सहभागी होता आले. इतर विद्यार्थ्यांनी हेळसांडच झाली. त्या साऱ्यांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात येता येणार आहे. या नव्या पद्धतीने अभ्यासक्रमाचा किती भाग समाविष्ट असेल, किती काळ शाळा चालणार, त्यात परीक्षांचा कालावधी कधी आणि किती असणार, या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे लवकरच मिळतील. कमी वेळात अधिकाधिक विषयांना पुढे नेण्याचा प्रयत्न शिक्षकांना करावा लागणार आहे.

त्यात इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. गृहपाठावर लक्ष केंद्रित करावे आणि पालकांनी या प्रक्रियेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शिक्षकांनी केले आहे. 

असे आहे नियोजन 

  • बैठक क्रमांकानुसार सम आणि विषम असे दोन गट केले आहेत. सम क्रमांकाचे आज, तर विषमचे उद्या शाळेला येतील. एक आड एक दिवस शाळा भरणार आहे. 
  • काही शाळांनी एकूण पटापैकी निम्मे विद्यार्थी आज, निम्मे उद्या असे विभाजन केले आहे. 
  • जिल्हा परिषदेच्या तुकड्या छोट्या आहेत. तेथे दररोज वर्ग भरणार आहेत. त्यात तुकडे करण्यात आलेले नाहीत. 
  • सकाळी 11 ते दुपारी 2 वेळेत शाळा भरणार आहे. 
  • या वेळात जेवणाची सुटी असणार नाही. 
  • वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसू शकेल. 
  • प्रत्येकाने स्वतःची पाण्याची बाटली स्वतः आणायची आहे. 
  • ताप, सर्दी, खोकला असे आजार असतील तर शाळेला यायचे नाही. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Classes V to VIII ready to welcome students; Starting tomorrow