मुख्यमंत्री- पालकमंत्र्यांनी कोरोनाचा रोज आढावा घ्यावा...संवाद नसल्याने जनता सैरभैर....चंद्रकांतदादा पाटील 

धर्मवीर पाटील
Monday, 3 August 2020

इस्लामपूर (सांगली)- मुख्यमंत्र्यांनी राज्याचा आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा न सोडता रोज आढावा घेऊन कोरोनाने भयभीत झालेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. 

इस्लामपूर (सांगली)- मुख्यमंत्र्यांनी राज्याचा आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा न सोडता रोज आढावा घेऊन कोरोनाने भयभीत झालेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रकाश हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, ""मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून आढावा घेतायत, त्याने काही साध्य होणार नाही. रोज "व्हीसी' द्वारे जिल्ह्यांचा आढावा घ्यावा. सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आवाक्‍याबाहेर निघाली आहे. पालकमंत्र्यांनी रोजच्या रोज आढावा घेऊन सायंकाळी सातला पत्रकार परिषदेत माहिती द्यावी. शासनाचा नागरिकांशी संवाद नसल्याने सैरभैर अवस्था झाली आहे. लोकांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी तसा विश्वास दिला पाहिजे. इस्लामपुरात कोरोनाची स्थिती चांगली हाताळली गेली. यात आमचे नगराध्यक्ष किंवा पालकमंत्री यांचे कौतुकच आहे. हाच पॅटर्न सांगलीत राबवला पाहिजे.'' 

ते पुढे म्हणाले, "निशिकांत पाटील यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरने प्रभावित झालो. प्रशासनावर मोठा ताण आहे. कोरोना सामाजिक समस्या बनल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सेवेची ही संधी समजून प्रत्येकाने सहभाग दाखवावा. तालमी, मंडळे, संघटनांनी पुढाकार घ्यावा. पुण्यात मी स्वतः लक्षणे नसणाऱ्या 104 रुग्णांसाठी मोफत व्यवस्था केली आहे. पुण्यात सध्या 17 हजार रुग्ण आहेत. "आरएसएस' ने सुमारे 2200 जणांसाठी 9 केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे शासनावरचा ताण कमी झालाय. अद्यावत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सुविधांसाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे.'' 
ते म्हणाले, ""वाळवा तालुक्‍यातील भाजपमध्ये गटतट असले तरी ही स्थिती सुधारेल. कुटुंब मोठे झाले की कुरबुर, खळखळ होणार. प्रत्येकजण पक्षात येताना आपापली राजकीय पार्श्वभूमी घेऊन येतो, त्यामुळे भाजपमध्ये स्थिर होण्यास, जमवून घेण्यास वेळ लागेल. निशिकांत पाटील यांचे काम चांगले आहे, त्यांच्या कामाचा लवकरच यथोचित सन्मान केला जाईल.'' 

सरकारचे कृत्रिम बहुमत- 
महात्मा फुले योजना बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, "नवीन सरकारने नवे काय केले हे सांगायला काही नाही मात्र जुन्या सरकारचे त्यांनी अनेक चांगले लोकोपयोगी निर्णय रद्द केले. जलयुक्त शिवार योजना रद्द करण्याची गरज नव्हती. थेट सरपंच निवड, प्रभाग पद्धती, आणिबाणीमधील लोकांची पेन्शन, मागासवर्गीय वसतीगृहाचा निधी, मराठा समाज वसतिगृह निधी याबाबत चूक केली. साखर कारखाना सवलती दिल्या होत्या, त्यापैकी मोहोळ, पंढरपूर, वारणानगरचे निर्णय रद्द केले, परंतु भालकेंना परवानगी दिली. सध्याच्या सरकारचे बहुमत कृत्रिम आहे, आपल्याकडे लोकशाही आहे, ते मान्यच करावे लागेल. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, "ते प्रकरण फार नाजूक आहे, त्यावर न बोललेलेच बरे. त्याचे संशोधन सुरु असून मीह माहिती घेतोय.' 

भिडेंचे "ते' वैयक्तिक मत- 
शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात, असे विधान केले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना श्री. पाटील म्हणाले, "ते भिडेंचे वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाचे आपापले संशोधन असते. भिडेंचे संशोधन वेगळे असेल. राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा भाग आहे. मंदिर शांततेने पूर्ण व्हावे ही अपेक्षा आहे. देशाच्या प्रत्येक गोष्टी आपला मानणारा प्रत्येकजण हिंदू आहे. राम या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मंदिराच्या उभारणीचा आनंद सर्वानी आपापल्या घरी राहून साजरा करावा.' 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM- Guardian Minister should review Corona daily . Chandrakantdada Patil