esakal | सहकार चळवळीबाबत वर्षभर विचारमंथन व्हावे : पृथ्वीराज चव्हाण... गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्षास सांगलीत प्रारंभ 
sakal

बोलून बातमी शोधा

gulabrao patil jayanti.jpg

सांगली-  सध्या सहकार चळवळ मोडण्याचे प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेकडून होत आहे. सहकारी बॅंकांबद्दल त्यांचे नकारात्मक मत आहे. त्यामुळे यावर मुलभूत चर्चा होऊन विचारमंथन झाले पाहिजे. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात सहकार प्रशिक्षण, कायदा आणि सुधारणा यावर चर्चा झाली पाहिजे. देशभरातील तज्ज्ञांना बोलवून खऱ्या अर्थाने विचारमंथन करून केंद्र सरकारसमोर सूचना मांडल्या पाहिजेत असे प्रतिपादन जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "व्हिडिओ कॉन्फरन्स' द्वारे केले. 

सहकार चळवळीबाबत वर्षभर विचारमंथन व्हावे : पृथ्वीराज चव्हाण... गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्षास सांगलीत प्रारंभ 

sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली-  सध्या सहकार चळवळ मोडण्याचे प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेकडून होत आहे. सहकारी बॅंकांबद्दल त्यांचे नकारात्मक मत आहे. त्यामुळे यावर मुलभूत चर्चा होऊन विचारमंथन झाले पाहिजे. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात सहकार प्रशिक्षण, कायदा आणि सुधारणा यावर चर्चा झाली पाहिजे. देशभरातील तज्ज्ञांना बोलवून खऱ्या अर्थाने विचारमंथन करून केंद्र सरकारसमोर सूचना मांडल्या पाहिजेत असे प्रतिपादन जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "व्हिडिओ कॉन्फरन्स' द्वारे केले. 

गुलाबराव पाटील जन्मशताब्दीनिमित्त आज जिल्हा बॅंकेच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बॅंकेच्या सभागृहात जन्मशताब्दी लोगोचे अनावरण महापौर गीता सुतार यांच्याहस्ते झाले. त्यानंतर "व्हिडिओ कॉन्फरन्स' द्वारे माजी मुख्यमंत्री चव्हाण, समितीचे स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या. 

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ""गुलाबराव पाटील यांनी दिल्लीत 12 वर्षे राज्यसभेत असताना सहकार चळवळीला बळकटी देण्याचे काम केले. सहकार चळवळीसह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करत ठसा उमटवला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यातील सहकार चळवळ शाश्‍वत ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.'' 
स्वागताध्यक्ष पाटील म्हणाले, ""सहकार क्षेत्रात गुलाबराव पाटील यांनी वेगवेगळ्या स्तरावर काम केले. तिसऱ्यांदा खासदारकीची संधी नाकारून सहकार क्षेत्रात तपस्वी म्हणून काम केले. चांगल्या प्रवृत्तीने राजकारण केले तर लोकांची सेवा अधिक चांगली होते दाखवून दिले.'' 
बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले, ""गुलाबराव पाटील यांच्या कामाचा गाभा म्हणजे सहकार क्षेत्र होते. जिल्हा ते राज्य बॅंकेपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय राहिला. सहकार चळवळ उभी राहण्यासाठी शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले. आज चळवळ टिकण्यासाठी गुलाबरावांनी ज्या प्रमाणे काम केले, त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे.'' 

सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम म्हणाले, ""गुलाबराव पाटील राज्यसभेवर काम करताना राष्ट्रीय स्तरावर सहकार नेला. आज सहकार बॅंकिंग क्षेत्रावर निर्बंध आणले जात आहेत. अशावेळी सहकारातील लोकांनी एकत्रित येऊन चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. हीच गुलाबराव पाटील यांना खरी श्रद्धांजली असेल.'' 
प्रारंभी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. नविन वर्षात विविध कार्यक्रम राज्यभरात घेऊन गुलाबराव पाटील यांच्या विचाराचा जागर केला जाईल असे त्यांनी सांगितले. 
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, महापौर गीता सुतार, माजी महापौर किशोर जामदार, गौतम पाटील, सहकार बोर्डाचे डॉ. प्रताप पाटील, नगरसेवक अभिजीत भोसले, संतोष पाटील, निरंजन आवटी, करण जामदार, इलाही बारूदवाले, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, हणमंतराव देशमुख, शेवंता वाघमारे, बॅंकेचे सरव्यवस्थापक बी.एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते. 

सहकार बॅंकिंगवर संकट- 
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ""गुलाबराव पाटील यांचे मन राजकारणात रमणारे नव्हते. त्यांना राजकारणात मिळणाऱ्या अनेक संधी नाकारून सहकार क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच पक्ष संकटात असताना मोठी ताकद दिली. सच्चा कॉंग्रेसी अशीच त्यांची ओळख होती. आज देशात सहकार बॅंकिंग क्षेत्रावर मोठे संकट येऊ घातले आहे. सहकारावर घाला घातला जात आहे. लोकशाहीवर हल्ले होत आहेत. अशावेळी गुलाबराव पाटील यांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात.''