सांगली जिल्ह्यात आता सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा धुरळा

प्रमोद जेरे
Sunday, 27 December 2020

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर लगेचच सांगली जिल्ह्यात तब्बल 2 हजार 421 संस्थाच्या निवडणूक घेण्याचा आगामी वर्षात उरकण्याचा सहकार विभागाचा मानस आहे.

मिरज : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर लगेचच सांगली जिल्ह्यात जिल्हा बॅंक, बाजार समिती, नागरी सहकारी बॅंका, प्राथमिक शिक्षक बॅंक, सांगली सॅलरी अर्नस सोसायटी आणि गावपातळीवरील सोसायट्या अशा तब्बल 2 हजार 421 संस्थाच्या निवडणूक घेण्याचा आगामी वर्षात उरकण्याचा सहकार विभागाचा मानस आहे.

याची तयारी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू होणार असून, त्यासाठी या विभागातील कर्मचाऱ्यांना अन्य निवडणुकांची कामे सांगू नयेत अशी विनंतीही जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) निळकंठ करे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या या निवडणुका आगामी वर्षभरात घेण्याचा सहकार विभागाचा मानस आहे. यासाठी सहकार विभागात महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण ही स्वतंत्र आस्थापनाच निर्माण करण्यात आली असून, त्याद्वारे या सगळ्या निवडणुकांचे सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. जिल्ह्यातील अ, ब, क, आणि ड अशा चार गटांतील सर्व सहकारी संस्थामध्ये प्रामुख्याने अ गटात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि बाजार समितीचा समावेश आहे.

या दोन संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर ब गटातील नागरी सहकारी बॅंका, पगारदार संस्थाच्या निवडणुका होतील व नंतर गावपातळीवरील 735 सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचे सोपस्कार पार पाडले जाणार आहे. यामुळे सहकार विभागाचे आगामी वर्ष हे निवडणूक वर्षच असणार आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागातील आधिकाऱ्यांनी या सर्व संस्थाच्या निवडणुकांच्या तयारीचे प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारण मंडळाच्या पुणे येथील कार्यालयास पाठवले आहेत. 

या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग लागणार असल्याने सहकार विभागातील कर्मचाऱ्यांसोबतच अन्य विभागातील कर्मचारीही मोठ्या संस्थेच्या निवडणुकीसाठी घेतले जाणार आहेत. त्यामुळे आगामी वर्षातील अन्य कोणत्याही निवडणूक कामासह सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीही सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाऊ नयेत, अशी विनंती जिल्हाधिका-यांना सहकार विभागाने केली आहे. 

हे असतील निवडणूक निर्णय अधिकारी 
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी काम पाहणार आहेत, तर सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी हे सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक किंवा तालुका उपनिबंधक वर्ग 1 च्या आधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Co-operative society elections will be taken in Sangli district in January