
साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून लाखो रुपये घेवून परागंदा होणाऱ्या तोडणी मजूर व मुकादमांकडून पैसे वसूल करण्यास प्रशासन व पोलीस खात्याने मदत करावी, अशी मागणी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वाळवा तहसिलदार रवींद्र सबनीस यांना निवेदनाद्वारे केली.
इस्लामपूर : साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून लाखो रुपये घेवून परागंदा होणाऱ्या तोडणी मजूर व मुकादमांकडून पैसे वसूल करण्यास प्रशासन व पोलीस खात्याने मदत करावी, अशी मागणी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वाळवा तहसिलदार रवींद्र सबनीस यांना निवेदनाद्वारे केली.
सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, वाळवा प्रांताधिकारी व शिराळा तहसिलदार यांनाही असे निवेदन देण्यात येणार आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, शेती समितीचे अध्यक्ष श्रेणीक कबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी संचालक विराज शिंदे, माणिक शेळके,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,राजारामबापू दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम फडतरे, संचालक पोपटराव जगताप,आष्टयाचे रघुनाथ जाधव,नगरसेवक जगन्नाथ बसुगडे,राजू आत्तार,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,तसेच सर्व गटाधिकारी, व वाहन मालक उपस्थित होते.
मुकादमांनी ऊस तोडणी मजूर पुरवठा केलेला नाही. त्यामुळे ऊस वाहतूक वाहन मालकांचा व्यवसाय बुडाला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यास गेले असता,अथवा त्यांना आपल्या भागात आणले असता, अपहरणसारख्या खोट्या पोलीस केसेस घातल्या जातात. उलट आपल्या भागातील पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीच्या पोलीस केसेस दाखल करून घेऊन वाहन मालकांना या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करावी, अशी कैफियात निवेदनात मांडली आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार