वारणा काठच्या भाषेचे रंग अनेक 

marathi
marathi

मांगले (सांगली) ः वारणा नदीचे खारे आणि काठ रांगडा आहे. बोलली जाणारी भाषा रांगडी, राकट आणि ग्रामीण ढंगाची आहे. वारणा नदीचा उगम चांदोली अभयारण्यात झाला आहे. चांदोली अभयारण्य सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सरहद्दीत विस्तारलेय. धरणानंतर पाणलोट क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन झाले. विस्थापितांची बोलीभाषा मात्र कायम राहिली. धरणग्रस्त वसाहतीत गेलात तरी हे लोक भाषेवरून वारणाकाठचे हे लक्षात येतेच. 


वारणा शिराळा, वाळवा तालुक्‍यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा तालुक्‍यांना स्पर्श करून जाते. पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेत काही शब्द सहज पण चपखल बोलले जातात. ते लिखित स्वरुपात वापरले जात नाहीत. "लेका', "बेट्या' असे शब्द अभिजन शिवराळ समजतात. पण वारणा काठावर ते वापर सर्रास वापरेल जातात. अन्य कोठे ते ऐकायलाही मिळत नाहीत. 


वारणाकाठावरील बाजारात काही परवलीचे शब्द वापरले जातात. ते दलाल (हेडेकरी) म्हणजे मध्यस्थी करणारेच वापरतात. शेतकऱ्यांना लपवालपवीचे व्यवहार समजू नयेत म्हणून. गावांची महती, माहिती सांगणारे काही शब्द अजूनही अशिक्षीत स्त्री-पुरुषांच्या तोंडी ऐकायला मिळतात. त्यातून गावांची नाव, वैशिष्ट्य, विशेषगुण मांडले जातात. शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भाग आणि शाहूवाडी तालुक्‍याच्या उत्तर भागात, पिक पेरणी आणि काढणीवेळी काही शब्द खास वापरले जातात. भाताचे मोठे उत्पादन घेतले जाते. भातात पाणी साचले असतानाही तण काढणे गरजेचे असते. फळ्या मारलेल्या उंच ठोकळ्यावर बसल्याखेरीज भांगलण करता येत नाही. त्याला तीरावडे म्हटले जाते. मोठ्या पावसात शेतांत संरक्षणासाठी कामट्याच्या पट्ट्या लावून पळस, पिंपळाची पाने लावून तयार केलेले खोळे वापरले जाई. ते इरले. आता त्याला प्लास्टीक कागद लावून इरले केले जाते. 
बैलाला हिर्र...अशी सुरात हाक दिली जाते. महसुली अधिकाऱ्यांना सर्रास अण्णासाहेब म्हणून बोलावले जाते. या परिसरात तलाठी, ग्रामसेवकांना दिवाणजी म्हणूनच बोलावले जाते. त्याचवेळी वरिष्ठांना साहेब म्हणून बोलावले जाते. कितीवेळ शोधतोय म्हणण्याऐवजी "कितीवेळ हुडकतोय'. तुम्हाला बोलावतायत ऐवजी "तुम्हाला बलवतंय' हे शब्द या पट्ट्यातच बोलले जातात. काहीही बोलू नको याला "थातूर मातूर काय सांगू नग'. "तुला इंगा दाखवतो' या शब्दाची प्रचिती याच परिसरात येते. 
कपड्यांसाठी वापरले जाणारे काही शब्द हमखास याच भागात आजही ऐकायला मिळतील. जसे की, शर्टाला पैरण, मुलींच्या ड्रेसला गंजीफ्रॉक, शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आणि शाहूवाडी तालुक्‍याच्या उत्तर भागात इकडून तिकडून म्हणण्या ऐवजी "हिकुंडं', "तीकुंडं' शब्द कानावर येतो. दुचाकीला फटफट, खासगी वाहतूक करणाऱ्या रिक्षाना डुगडुग, टमटम असे शब्द वापरले जातात. जुन्या पिढीतून नव्या पिढीत संक्रमित झालेले काही शब्द आजही वापरात आहेत. आगा, व्हैगा, कवासा आलास, गेलास, गुळाच्या ढेपेला भेली, भेलकांड, लहान ढेपेला पिल्लू म्हणतात. धनगर वाड्यातील लोक आजही काडीपेटीला माचीस म्हणतात. धान्य साठवण्याच्या चिवकाटीच्या कामटी टोपलीला कोथळी, कणगी, टोपलं म्हणतात. कोंबड्यांना बसण्यासाठी तयार केलेल्या चिवकाटीच्या टोपलीला खुराडे, तर घरी थंडीत हमखास वापरण्यात येणाऱ्या पांघरुणाला वाकाळ, धुपटं म्हटले जाते. 


वारणा काठावर काही गावांची नावे एक आणि त्यांची टोपण नावे वेगळी घेतली जातात. पन्हाळा तालुक्‍यातील बोरपाडळेला बहुतेक जण आजही गोरपाळे म्हणतात. गावांच्या नावावरून काही विशेषणे जुन्या लोकांनी तयार केली आहेत. विशेषतः माहेर वाशिनी जास्त वापर करतात. कांदं, मांगलं नांदायला चांगलं, सरूड सागाव हाय माझ्या वगाव... काही ठेवणीतील जुने शब्द आजही या भागात वापरले जात आहेत. जसं की कोरड्यास, कालवण, माडगं, बुळगं, हापटन, फटफट, डूुगडूग, टमटम, आगा, व्हैगा, कवासा आलास, गेलास, कुणग, वाफा, पाटग, हुडंकतंय, बलंवतंय, नाटकी सांगू नग, कोरड्यास, बुळग, दारकू, शेवगा हागीवला, (शेवया केल्या), थातूर मातूर, इंगा दाखवतो, गोरपाळे, कडूली, कुडतं, गंजीफ्रॉक, पैरण, हिकुंड, तिकुंडं, कोथळी, कणग्या, टोपलं, खुराडे, बाजार, भेलकांड, भेली, पिल्लू, गोधडी, वाकाळ, धुपटे, गोणपाट, गोणी, धून, वान, अंगात बिन्गात, आयार म्हायार. काही गावांची इतर वैशिष्ट्ये सांगणारी विशेषणे काही वयस्कर स्त्रियांच्या तोंडपाठ आहेत, ते मात्र कुठेही लिखित नाहीत. 


त्याचबरोबर काही गावांची इतर वैशिष्ट्ये सांगणारी विशेषणे काही वयस्कर स्त्रियांना तोंडपाठ आहेत. ते मात्र कुठेही लिखित नाहीत, त्यातील काही निवडक विशेषणे ः दाम शींदा तनाळकरीन, सालट बायको पन्हाळ करीन, डीवाळ खाती निवळ करीन, हांडचोरत्यात्या शित्तूर करणी, ऊसात बसत्यात्या सोडूल करणी, पोटफुगीवत्यात्या गोंडूलकरणी, घोड्यावर बसत्यात्या चिचूलकरणी, टिळा लावत्यात्या मांगरूळ करणी, शेंगा चाळत्यात्या माळवाडकरणी, कोंबड्या इकत्यात्या बिळासकरणी, हातात खडव पिशवी करणी, डिंबात बोलण बांधावर करणी, कटक घेत्यात्या सागावकरणी, कलिंगड इकत्यात्या सरूडकरणी, कापडाची विक्री कापशी करणी, कांद लावत्यात्या शिवार करणी, हातात कासुटा माणगाव करणी, वाळक इकत्यात्या भेडसगावकरणी, मक्‍याच्या मळीत नेर्लकरणी, सडत्यात्या तांदुळ कुकरूड करणी, आवट घालत्यात्या कुतुल करणी, पुरी भाजी खात्यात्या कांडवण करणी, खांद्यावर खुदळ आवतूर करणी,पावट इकत्यात्या शिंदवाडकरणी, दूध घालत्यात्या कडवकरणी, तीरावड्यावर बसत्यात्या निळकरणी, गालाला गोंदण  चांदुलकरणी, दंडात तोळमण वालूरकरणी, पाव खात्यात्या आंबकरणी, मोठी जोडवी गोगाव करणी, भात लावत्यात्या वाकुल करणी, तमाशा बघत्यात्या शिराळकरणी, तांदळाचा यापार करत्यात्या मलकापूर करणी, अशा या वारणा काठच्या भाषेला प्रसिद्ध साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, चंद्रकुमार नलगे या साहित्यिकांनी साहित्यातून पुढे आणले. "फकिरा' अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीत वारणा काठचीच बोली आहे. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांच्या पानापानात वारणा काठच्या भाषेची पखरण झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या "रातवा' या कादंबरीतही वारणाकाठ ओतप्रोत भरलेला दिसतो. वारणेचा वाघ हा सिनेमा तर पूर्णपणे या भागावरच आहे तर अशी हि वारणा काठची रांगडी बोली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com