वीजेसंदर्भातील तक्रार या "व्हॉटस्‌ ऍप' वर "पोस्ट' करा 

mahavitran.jpg
mahavitran.jpg

सांगली-  वीजेची तार तुटणे, जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेटीचा दरवाजा तुटणे, केबल उघड्यावर पडणे आदी धोकादायक प्रकाराबाबत महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रार करण्याची आता गरज नाही. महावितरणने "व्हॉटस्‌ ऍप' वर तक्रार करण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. "व्हॉटस्‌ ऍप' वर तक्रार "पोस्ट' केल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. 

शहरी व ग्रामीण भागात विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये विविध कारणातून धोके निर्माण होऊ शकतात. लोंबकळणाऱ्या वीजेच्या तारेचा धक्का लागून यापूर्वी अनेकांचा मृत्यू झाला आहे. वीजेचा खांब धोकादायकपणे वाकणे, तारांना झोल पडणे, फ्यूज असलेल्या पेट्या किंवा फिडर पिलरचा दरवाजा तुटणे, तसेच वीजेच्या तारेवर फांदी तुटून पडणे आदी कारणामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर किंवा कोणीतरी लेखी तक्रार केल्यानंतर तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर असे प्रकार आढळल्यास दुरूस्ती केली जाते. बऱ्याचदा माहिती मिळण्यास उशिर झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

वीजेच्या समस्येबाबत तत्काळ माहिती मिळून धोका टाळणे आवश्‍यक असते. त्यामुळेच महावितरण कंपनीने ग्राहकांना तत्काळ तक्रारीसाठी "व्हॉटस्‌ ऍप' चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार महावितरण कंपनीच्या सुनियंत्रण कक्षात (डीएसएस रूम) मध्ये उपलब्ध असलेल्या महावितरण कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर "व्हॉटस्‌ ऍप' सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार वीजेचे धोकादायक खांब, तुटलेली तार, लोंबकळणारी तार आदी तक्रार किंवा माहिती ग्राहकांना संबंधित "व्हॉटस्‌ ऍप' क्रमांकावर पाठवता येईल. महावितरणकडून "व्हॉटस्‌ ऍप' वर प्राप्त झालेल्या तक्रारींची एक्‍सेल फाईलमध्ये नोंद केली जाईल. त्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता किंवा उपविभागीय अधिकारी यांना ती पाठवली जाईल. संबंधित कार्यक्षेत्रातील कार्यालयाकडून तक्रारीचे निवारण केल्यानंतर दुरूस्ती केलेल्या वीजयंत्रणेच्या छायाचित्रासह सुनियंत्रण कक्षात माहिती कळवली जाईल. तक्रारीचे निवारण झाल्याची खात्री झाल्यानंतर संगणकात त्याची तारखेसह नोंद ठेवली जाईल. तसेच तक्रारदारास देखील दुरूस्तीनंतरचे छायाचित्र "व्हॉटस्‌ ऍप' द्वारे पाठवले जाणार आहे.

"व्हॉटस्‌ ऍप' वरील तक्रारींची संख्या आणि सोडवलेल्या तक्रारीची माहिती मंडल किंवा परिमंडलाकडून दर 15 दिवसांनी प्रादेशिक संचालक पुणे यांना पाठवली जाईल. "व्हॉटस्‌ ऍप' वरील तक्रारीचे निराकरण करण्यासाठी समन्वयक म्हणून मंडल कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन), विभागीय कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना जबाबदारी दिली आहे. 


या क्रमांकावर तक्रार करा- 
सांगली मंडलातील वीजेसंबंधी तक्रारीसाठी 7875767123 या मोबाईल क्रमांकावर "व्हॉटस्‌ ऍप' वरून तक्रार पाठवावी लागेल. तेथून तक्रार संबंधित कार्यालयाकडे पाठवली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com