शासकीय, खासगी रूग्णालयांचे "ऑडिट' 15 दिवसांत पूर्ण करा

विष्णू मोहिते
Wednesday, 13 January 2021

सांगली जिल्ह्यातील सर्व ासकीय व खासगी रूग्णालयांचे फायर, इलेक्‍ट्रीकल व स्ट्रक्‍चरल ऑडिट 15 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

सांगली : भंडारा जिल्ह्यात शासकीय रूग्णालयातील भीषण आग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ासकीय व खासगी रूग्णालयांचे फायर, इलेक्‍ट्रीकल व स्ट्रक्‍चरल ऑडिट 15 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय व खासगी रूग्णालयांचे फायर, इलेक्‍ट्रीकल व स्ट्रक्‍चरल ऑडिट बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. मिसाळ, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, महानगरपालिका चिफ फायर ऑफिसर चिंतामणी कांबळे, महानगरपालिका विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण, विद्युत निरीक्षक श. मा. कोळी, सहाय्यक विद्युत निरीक्षक अ. बा. माने आदि उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, यंत्रणांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली यांचे फायर ऑडिट महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने करून त्याबाबतच्या असणाऱ्या त्रुटी, आवश्‍यक असणारी साधनसामग्री याबाबतचा अहवाल तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करावा.

आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत शासनास तातडीने सादर करावा. तसेच विद्युत निरीक्षकांनी फायर सेफ्टीचे इतर सर्व रूग्णालयांचे ऑडिट करून त्याबाबतचा अहवाल द्यावा. फायर सेफ्टी ऑडिट करताना प्राधान्यक्रम ठरवावा. यामध्ये प्रामुख्याने रूग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयु), लहान बालकांचे विभाग, गंभीर आजारांचे रूग्ण विभाग येथील ऑडिट प्राधान्याने करावे. तसेच आग लागण्याच्या कारणांचाही सखोल अभ्यास करण्यात यावा. यामध्ये आरोग्य विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली आरोग्य विषयक उपकरणे, शासनमान्य संस्थांकडून तपासणी करून घ्यावीत. उपकरणांचेही ऑडिट तातडीने करून घ्यावे. 

जिल्ह्यातील खासगी रूग्णालयांनी त्यांचे फायर ऑडिट ते ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहेत. त्यांच्याकडून करून घेण्यात यावे. तसेच इलेक्‍ट्रिकल ऑडिट संबंधित रूग्णालयांच्या समित्यांकडून स्वप्रमाणित करून घ्यावे. खासगी रूग्णालयातील या दोन्हीही यंत्रणा अद्ययावत व सुस्थितीत ठेवाव्यात. याबाबतचीही कार्यवाही तातडीने करण्यात यावी. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the "audit" of government and private hospitals within 15 days