
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या तक्रारी वाढल्याचे शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे पोस्ट कोविड उपचाराबाबत रुग्णांनी तितकीच दक्षता घेण्याची गरज आहे.
सांगली : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या तक्रारी वाढल्याचे शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे पोस्ट कोविड उपचाराबाबत रुग्णांनी तितकीच दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः ज्या रुग्णांना आधीपासून दम्यासह विविध आजार आहेत त्यांच्यासमोर आरोग्याच्या अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत.
कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. जवळपास चाळीस हजारांवर रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या दोन अडीच महिन्यात असा कोरोनामुक्तांच्या तक्रारींमध्ये बरेच साम्य दिसून येत आहे. विशेषतः अशक्तपणा ही दृश्ये तक्रार प्रत्येकाची आहे. फुप्फुसामध्ये जाळी होणे, श्वासनलिका रुंद होणे, फुप्फुसाची एकूण कार्यक्षमता कमी होणे अशा प्रमुख तक्रारी आहेत. ज्यांना मधुमेह, हृदयविकाराचा, दम्याचा त्रास आधीपासून आहे अशा रुग्णांबाबत ही लक्षणे अधिक आहेत. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी फुप्फुसाचे आकुंचन व प्रसरण होत असते. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ही क्रिया कमी होते त्यामुळेही वारंवार जंतुसंसर्ग होतो. एकूणच फुप्फुसाची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कुमकुवत होते.
अनेक रुग्णांना अशक्तपणा, घशात खवखव, खोकला, रात्रीच्यावेळची त्रासदायक सर्दी, चव-वास हरवणे अशा तक्रारी दिसून येत आहेत. पचनसंस्था, रक्तप्रवाह संस्था, रक्तशुद्धीकरण संस्था, मूत्रवहन संस्था, श्वसनसंस्था, स्मरणशक्ती, लैंगिक शक्ती आदी शरीरातील यंत्रणांवर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.
संतुलित आहाराकडे लक्ष द्या
रुग्णांनी स्वतःच्या शारीरिक तक्रारीबद्दलची निरीक्षणे डॉक्टरांना सांगावीत. नित्य कामे सुरवातीस पन्नास टक्के आणि नंतर हळूहळू महिन्याभरात पूर्वपदावर आणावीत. व्यायामही पूर्वीपेक्षा निम्मा आणि नंतर प्रकृतीस साजेसे असे व्यायाम सुरू करावेत. श्वसनाच्या व्यायामांना अधिक महत्त्व असेल. पौष्ठिक संतुलित आहाराकडे लक्ष द्या.
- वैद्य मनोज पाटील
प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर रहा.
कोविड केंद्रात प्रतिकार क्षमता वाढीची औषधे परस्पर बंद करू नका. रक्त पातळ होण्यासाठीची औषधेही तत्काळ बंद करू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत निर्णय घ्या. आवश्यक वाटल्यास फुप्फुसाच्या तपासण्या करा. किमान तीन महिने चांगली विश्रांती घ्या. प्रदूषणयुक्त वातावरणापासून दूर रहा.
- डॉ. अनिल मडके
संपादन : युवराज यादव