esakal | इस्लामपुर लॉकडाऊन तिसरा दिवस : संमिश्र प्रतिसाद

बोलून बातमी शोधा

Comprehensive response on the third day in Islamabad

इस्लामपूर (जि. सांगली) नगरपालिका प्रशासनाने पुकारलेल्या तीन दिवसांच्या 100 टक्के लॉकडाऊनला पहिले दोन दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला; परंतु आज तिसऱ्या दिवशी काही प्रमाणात किराणा दुकाने आणि इतर सेवा सुरू होत्या.

इस्लामपुर लॉकडाऊन तिसरा दिवस : संमिश्र प्रतिसाद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : नगरपालिका प्रशासनाने पुकारलेल्या तीन दिवसांच्या 100 टक्के लॉकडाऊनला पहिले दोन दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला; परंतु आज तिसऱ्या दिवशी काही प्रमाणात किराणा दुकाने आणि इतर सेवा सुरू होत्या, त्यामुळे नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (ता. 16) रात्री उशिरा प्रशासनाने व्यापारीवर्गाला व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे काही ठिकाणी व्यवहार सुरू होते. 

करोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरात 100 टक्के लॉकडाऊनचे आवाहन केले होते. सलग दोन दिवस शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. वाळवा तालुक्‍यातील रेठरे धरण येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर इस्लामपूर शहरात कडक उपाययोजना अवलंबण्यात आल्या आहेत.

रेठरेधरणचा तो रुग्ण मुंबई येथील चाचणीत पॉझिटिव्ह आला असल्याने आणि त्याच्यावर इस्लामपूर येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार झाले होते; त्यामुळे दक्षतेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे लॉकडाऊन आवाहन केले होते. कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी सलग तीन दिवस कोणत्याही कारणास्तव लोकांनी बाहेर पडू नये असे अवाहन असताना आज तिसऱ्या दिवशी काही प्रमाणात लोक बाहेर पडले.

रेठरेधरण येथील त्या पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या लोकांच्यावर प्रशासनाच्या वतीने बारीक नजर ठेवली जात आहे. अशा लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीची टीका आणि प्रशासनाचा पाठिंबा! 
नगरपालिकेच्या सोमवारच्या (ता. 13) तातडीच्या सभेत शहरात बुधवारी (ता. 15) ते शुक्रवारी (ता. 17) पर्यंत 100 टक्के लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. याला राष्ट्रवादीने नगराध्यक्षांवर नागरीकांच्यावर लादलेला लॉकडाऊन अशी टिका केली होती. पहिले दोन दिवस लॉकडाऊन यशस्वी पाळण्यात आला; मात्र गुरूवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांकडून किराणा दुकाने उघडी ठेवावीत असे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी काही प्रमाणात व्यवहार सुरु होते. 

नगरपालिकेने घेतली स्वतंत्र भूमिका

मुळात शासनस्तरावर लॉकडाऊनचे आदेश असताना इस्लामपूर नगरपालिकेने ही स्वतंत्र भूमिका घेतली होती. शहरातील काही नागरिकांच्या अत्यावश्‍यक बाबी मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या, त्यामुळे आम्हाला किराणा दुकान सुरू ठेण्याच्या सूचना द्याव्या लागल्या.
- नागेश पाटील, प्रांताधिकारी.