वाळवा तालुक्‍यात प्रशासनाची चिंता वाढली... पंचायत समितीमध्ये कोरोनाचा शिरकाव...भवानीनगरमध्ये खासगी डॉक्‍टर पॉझिटिव्ह

धर्मवीर पाटील 
Tuesday, 4 August 2020

इस्लामपूर(सांगली)- वाळवा तालुक्‍यात सोमवारी 18 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचायत समिती पाणी पुरवठा विभागात एक अधिकारी बाधित आढळले.

इस्लामपूर(सांगली)- वाळवा तालुक्‍यात सोमवारी 18 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंचायत समिती पाणी पुरवठा विभागात एक अधिकारी बाधित आढळले.

तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत निघाली असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे. तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 143 वर पोहोचली आहे. येथील बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात रुग्णांची व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान काल येथील वाळवा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कोरोनाबाधित झाल्याने दक्षतेचा भाग म्हणून पंचायत समितीची पूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्यात आली आहे. 

वाळवा तालुक्‍यातील चिकुर्डे येथे 45 व 19 वर्षीय 2 महिला तर 14 वर्षाचा युवक पॉझिटिव्ह आला आहे. भवानीनगर येथे 70 वर्षीय महिला व 42 वर्षे वयाचा पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. ताकारी येथे सोमवारी चार जण पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये चार वर्षाची लहान मुलगी व 8 वर्षे वयाचा मुलगा यांच्यासह 38 वर्षाची महिला आणि 15 वर्षाच्या युवकाचा समावेश आहे. आष्टा येथे 62 वर्षे वयाचा पुरुष, कासेगाव येथे 75 वर्षे वयाची वृद्ध महिला तर 45 व 78 वर्षे वयाचा पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. ढवळी येथे 45 वर्षे वयाचा पुरुष, भडकंबे येथे 5 वर्षे वयाचे बाळ, काळमवाडी येथे 35 वयाचा पुरुष व 30 वर्षे वयाची महिला तर मसुचिवाडी येथे 40 वर्षे वयाची महिला या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णांच्या राहत्या घरांच्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करून आरोग्य तपासणीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. 

भवानीनगरमध्ये भीतीचे वातावरण- 
वाळवा तालुक्‍यातील भवानीनगर व रेठरेहरणाक्ष येथे खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या एका डॉक्‍टरचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे या दोन्ही गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्‍टरशी संबंधित त्याच्याकडून उपचार घेतलेल्या 140 जण व कुटुंबातील 9 जणांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concern of administration increased in Valva taluka . Corona infiltration in Panchayat Samiti . Private doctor positive in Bhawaninagar