वैद्यकीय "पोस्टिंग'वेळी "लेडिज फर्स्ट'ने गोंधळ; कुठे ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी करारावर निवडलेल्या वैद्यकीय सहायकांना नेमणुका देताना महिलांना प्राधान्य दिल्यामुळे पुरुष डॉक्‍टर मंडळींना तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला.

सांगली ः जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी करारावर निवडलेल्या वैद्यकीय सहायकांना नेमणुका देताना महिलांना प्राधान्य दिल्यामुळे पुरुष डॉक्‍टर मंडळींना तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. मेरिट नुसार या नेमणूका झाल्या पाहिजेत, अशी मागणी करत त्यांनी विषय ताणून धरला, मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी "नेमणूका देण्याचा अधिकार आमचा आहे, आम्ही ठरवू त्या कशा द्यायच्या', असे सांगत महिलांनाच प्राधान्यक्रम देण्याची भूमिका ठाम ठेवली. 

जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी मानधनावर आधारित डॉक्‍टरांची भरती केली आहे. त्यासाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाले. आता एकूण 306 जणांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. त्यात 158 पुरुष आणि 148 महिला डॉक्‍टरांचा समावेश आहे. या साऱ्यांना मेरिट लिस्टनुसार त्यांच्या इच्छित गावी नेमणूक द्यावी, अशी डॉक्‍टरांची अपेक्षा होती. चंद्रकांत गुडेवार यांनी तो सर्वाधिक आपल्या असल्याचे सांगत "लेडिज फर्स्ट' अशी भूमिका घेतली.

148 महिला डॉक्‍टरांना त्यांच्या गावापासून जवळचे उपकेंद्र निवडण्याची मुभा त्यांनी दिली. त्याबद्दल पुरुष डॉक्‍टरांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ही चुकीची पद्धत आहे, महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही असे झालेले नाही, असा युक्तीवाद करत त्यांनी श्री. गुडेवार यांची भेट घेतली. त्यांनी या डॉक्‍टरांच्या आक्षेपांना दाद दिली नाही. गुणांच्या आधारे निवडी होतात, नेमणुका नाही, असे स्पष्ट करत त्यांनी याबाबतचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेचे असल्याचे स्पष्ट केले. हा वाद अजून संपलेला नाही. पुरुष डॉक्‍टरांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion by "Ladies First" during medical "postings"; Read it where