पुन्हा "लॉकडाऊन'च्या चर्चेने बाजारात गोंधळ... पण, ही अफवाच ! 

अजित झळके
Tuesday, 14 July 2020

जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांत 300 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका, असा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सांगली शहरात अफवांचा बाजार गरम झाला असून पुढील दोन-तीन दिवसांत लॉकडाऊन होईल, अशी चर्चेची राळ उठली आहे.

सांगली ः जिल्ह्यात गेल्या 13 दिवसांत 300 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका, असा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सांगली शहरात अफवांचा बाजार गरम झाला असून पुढील दोन-तीन दिवसांत लॉकडाऊन होईल, अशी चर्चेची राळ उठली आहे. त्यामुळे लोक घाबरले असून पुढील आठ-पंधरा दिवस पुरेल इतके राशन आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी एकच घाई सुरु झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाला बाजारात अचानक तेजी उसळली आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी या भितीने जादा मालाची आवक थांबवली आहे. एका अफवेमुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. तीत मंत्री विश्‍वजीत कदम यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्यावर नियंत्रणासाठी काही नियम व अटी कडक करण्याबाबत चर्चा झाली. बाजारात लोक अतिशय मोकळेपणाने वावरत आहेत. त्याचा धोका असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. वाहतूक सुरळीत झाली आहे, लोक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत, महत्वाच्या कारणाशिवायही लोकांचा प्रवास होत आहे. जेवणावळी घातल्या जात आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे, अशी चर्चा झाली. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आणि लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. 

त्या एका आवाहनानंतर पुन्हा लॉकडाऊन होणार, अशीच चर्चा सुरु झाली. त्याचा परिणाम आज भाजीपाला बाजार, विष्णूअण्णा फळ मार्के येथे दिसून आला. येथे कांदा, बटाटा खरेदीसाठी किरकोळ व्यापाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली. बाजारात लोकही दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा माल भरता दिसले. काही घाऊक व्यापाऱ्यांनी सांगली बंदची धास्ती घेऊन आवक थांबवण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला बाजारातील दरात नाहक उसळी पहायला मिळाली. वास्तविक, लॉकडाऊनच्या या साऱ्या अफवा आहेत. जिल्ह्यात पूर्वसूचना न देता लॉकडाऊन होणार नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in the market with the talk of "lockdown" again ... but, this is a rumor!