इस्लामपूर पालिकेत 'आवाज ऐकू येत नाही'चाच गोंधळ 

Confusion of 'no sound can be heard' in Islampur Municipality
Confusion of 'no sound can be heard' in Islampur Municipality

इस्लामपूर : 'आवाज ऐकू येत नाही' या गोंधळात आजची नगरपालिकेची विशेष सभादेखील तहकूब करण्यात आली. 20 मार्चला रद्द झालेली विशेष सभा आज घेतली होती, तीही रद्द झाली. विशेष सभेची मागणी केल्यानंतर जे कलम वापरून सभा आयोजित करणे अपेक्षित होते, ते न केल्याने राष्ट्रवादीने जी हरकत घेतली ती नगराध्यक्षांनी फेटाळून लावली. नगरसेवकांनी गोंधळ घालून 'सभा ऑफलाईन घ्या' असा गजर केल्याने शेवटी सभा तहकूब करावी लागली. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेची आजची विशेष सभा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. साडे अकराची सभा सुमारे दोन तास उशिरा सुरू झाली. त्यानंतर पिठासन अधिकाऱ्यांनी सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत दोन वेळा उपस्थित सदस्यांची 'हजेरी' घेतली. 29 सदस्य हजर असल्याने सभा सुरू झाली. शिवसेनेने अगदी सुरवातीपासूनच सभा ऑनलाइन न घेता ऑफलाइन घ्यावी, असा आग्रह धरला. विकास आघाडीचे काही सदस्य शेवटपर्यंत सभेची खिल्ली उडवताना दिसत होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशामुळे काल होणारी विशेष सभा आज ऑनलाइन झाली. ती तशी का घेतली? याला आक्षेप घेतला गेला. वारंवार ही सभा ऑफलाईन घ्या अशी मागणी नगरसेवकांची होती, त्यावर वरिष्ठ प्रशासनाकडून आलेल्या संदर्भांचा दाखला देत ही सभा ऑनलाइनच होईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संजय कोरे यांनी याआधी विशेष सभेची केलेली मागणी, त्यासाठी आवश्‍यक कलम न वापरता दुसऱ्याच कलमान्वये काढण्यात आलेली नोटीस व त्याची मुदत यावरून आक्षेप घेत हरकत दाखल केली. 

कोरे यांनी सभेच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केले. सभेची नोटीस देण्याबाबतही त्यांनी हरकत सादर केली. ती हरकत नगराध्यक्षांनी फेटाळली. विषयपत्रिकेत झालेल्या चुकीला उत्तर देताना नगराध्यक्ष पाटील यांनी 'प्रिंटिंग मिस्टक' असल्याचे सांगत फेटाळून लावली. ऑनलाइन सभेच्या तांत्रिक अडचणीमुळे जिल्हाधिकारी यांना मुख्याधिकारी मार्गदर्शन मागतील त्यानंतर पुढील सभेची तारीख यथावकाश कळवली जाईल तोपर्यंत सभा तहकूब करत असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. 

'मीटिंग सुरू झाली काय?'...
पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी सभा संपेपर्यंत 'मीटिंग सुरू झाली काय?' हा एकच प्रश्न सातत्याने उपस्थित केला. त्याला वैभव पवार यांनी 'किती विषय संपले?' हा प्रश्न सातत्याने विचारून साथ दिली. या दोघांनी मिळून सभेची खिल्ली उडवली असल्याचा आरोप सभेनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com