निविदा बोलावण्यावरुन प्रशासनाचा संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणी : निविदा बोलावण्यावरुन प्रशासनाचा संभ्रम

निपाणी : निविदा बोलावण्यावरुन प्रशासनाचा संभ्रम

निपाणी : शहरातील जुन्या पी. बी. रोडसह पालिकेच्या जागेत विविध ठिकाणी उभारल्या जाणारया जाहिरात फलकांसाठीची निविदा प्रक्रीया दोन वर्षापूर्वी संपली आहे. मात्र दुभाजकासह सर्वच जागेसाठी एकाच निविदेला प्रतिसाद लाभणार नाही, या शक्यतेने नव्याने निविदा काढण्याबद्दल प्रशासन संभ्रमात आहे. कारण जाहिरातदारांकडून निवडक जागी फलक लावण्यासाठी प्राधान्य दिले जात असून तेवढ्याच जागेचे शुल्क भरण्यासाठी असंख्य लोक पसंती देत असल्याचे प्रशासनाचे पालिका अधिकारयांचे म्हणणे आहे.

अनेक वर्षानंतर जाहिरात फलक उभारण्यासाठी पालिकेने काही महिन्यापूर्वी दरवाढ केली आहे. नवीन वर्षातही हेच दर कायम ठेवले आहेत. शहरात जुन्या पी. बी. रोडवरील दुभाजकावर ठिकठिकाणी जवळपास २०० फलक उभारण्यासाठी लोखंडी फ्रेम उभारल्या आहेत. इच्छुकांना पालिकेत शुल्क भरल्यावर आवश्यक तेवढ्या फ्रेमवर जाहिरातीसाठी डिजीटल फलक उभारता येऊ शकतो. शिवाय शहरातील विविध चौक, मध्यवर्ती ठिकाणे, मुख्य रोड अशा ठिकाणी फलक उभारले तरी त्यासाठी शुल्क भरावे लागते. यापूर्वी चौरस फूटसाठी असणारे शुल्क कमी होते. मात्र मागील काही महिन्यात शुल्कात वाढ करून चौरस फूट जागेसाठी ५ रुपये शुल्क आकारले जात आहेत. पालिका जागेतील जाहिरात फलक विभागाचे वर्ष एप्रिल-मार्चअखेर असते. त्यासाठी पालिका निविदा बोलावून इच्छुकांना फलक उभारण्यासाठी परवाना देत असते.

हेही वाचा: दोन्ही बाजूंकडून चर्चेसाठी चाचपणी

मार्चमध्ये जाहिरातदारांची मुदत संपल्यावर पालिकेने संपूर्ण फलकांसाठी निविदा बोलावण्याची तयारी केली होती. मात्र त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता प्रशासनाला कमी वाटते. कारण निविदा बोलावल्यास वर्षाला किमान अडीच लाखाच्या सुमारास पालिकेला महसूल अपेक्षित आहे. निविदा बोलावल्यास एवढा महसूल जमा करण्यास एकच जाहिरातदार तयार होत नाही. येथील २०० पैकी नेहमी काही फलकांची मागणी जाहिरातदाराकडून होते. शिवाय फलक विभागून दिल्यास अपेक्षित महसूल जमा होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहरात जाहिरात फलक उभारण्यावर अनेकांचा भर आहे. त्यात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसासह इतर जाहिरात फलकांचा समावेश असतो. जाहिरात फलक लावण्याकडे कल वाढल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडत आहे. सध्या दुभाजकावरील असंख्य जाहिरातीच्या फ्रेम मोडकळीस आल्या आहेत. मोडकळीस आलेल्या फ्रेम पाहिजे असतील तर त्या दुरुस्त करून घ्याव्या लागणार आहेत. त्याचा खर्च मात्र पालिका देणार आहे. जाहिरात फलक निविदेचे आर्थिक वर्ष चार महिन्यांनी संपणार आहे. तत्पूर्वी निविदा बोलवावी की जाहिरातदारांच्या मागणीनुसार फलक उपलब्ध करून द्यावेत अशा संभ्रमात प्रशासन आहे.

सर्व जाहिरात फलकांच्या फ्रेमसाठी जाहिरातदारांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी वाटते. कारण काही फलक उपलब्ध करून देण्याची मागणी जाहिरातदारांकडून वाढली आहे. एकाचवेळी सर्व फलक उपलब्ध देतो म्हटले तर जाहिरातदार त्याला तयार नाहीत. शिवाय अपेक्षित महसूल वसूल होण्यावर परिणाम होत आहे. मागणीनुसार काही फलक दिल्यास जाहिरातदारांसह प्रशासनाला महसूल वुसुलीसाठी सुलभ ठरेल.

-चंद्रकांत हुड्डन्नावर, अभियंते, निपाणी नगरपालिका

loading image
go to top