नियमांबाबत संभ्रम : परवानगी असूनही हॉटेल "लॉकडाऊन'च

अजित कुलकर्णी
Saturday, 11 July 2020

शासनाने नियम व अटी पाळून हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिली खरी; मात्र हॉटेल चालकांना या परवानगीबद्दल संभ्रम आहे.

सांगली : शासनाने नियम व अटी पाळून हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिली खरी; मात्र हॉटेल चालकांना या परवानगीबद्दल संभ्रम आहे. लॉज व हॉटेलची सुविधा एकत्रित असेल तरच या आस्थापनांना परवानगी असल्यामुळे शहरातील ठराविक हॉटेलनाच त्याचा लाभ होणार आहे. हॉटेल चालक असोसिएशनने या निर्णयाविरुध्द नाराजी व्यक्‍त केली आहे. 

मुळात टाळेबंदी अजूनही असल्याने जिल्हाबंदी कायम आहे. त्यामुळे बाहेरुन लॉजवर येणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने शासनाचा हा आदेश म्हणजे डोळ्यात धूळफेक असल्याची टीका होत आहे. आज तब्बल चार महिन्यानंतर शहरातील काही निवासी हॉटेल सुरु झाली; मात्र तेथेही कोरोनाच्या भितीने ग्राहकांची वानवा होती. त्यामुळे शासनाच्या निर्णयामुळे चार महिन्यानंतरही हॉटेलचालकांच्या पदरी निराशाच आली. हॉटेलमध्ये निवास व उपहारगृहाची व्यवस्था एकत्रित असणाऱ्या ठिकाणी आज दिवसभरात मोजकेच ग्राहक आले.

कोविडसाठी प्रशासनाने मोठ्या हॉटेलमधील खोल्या क्‍वारंटाईनसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेलमधील 33 टक्‍के भाग वापरण्याचे निर्देश आहेत. सॅनिटायझर, हॅंडवॉश, मास्कचा वापर अनिवार्य आहे. ग्राहकाने हॉटेलमधील खोली सोडल्यानंतर ती निर्जंतुकीकरण करुन 24 तासांनी इतर ग्राहकांना वापरासाठी देण्याचीही अट आहे. या सर्व गोष्टींमुळे हॉटेल व लॉज व्यवस्थापनाचा खर्च वाढणार आहे. साहजिकच त्याचा परिणाम आकारण्यात येणाऱ्या भाड्यावर होणार असल्याने या आस्थापना बंद ठेवलेल्या बऱ्या अशी मानसिकता चालकांची आहे. फक्‍त हॉटेल सुरु करण्यास अद्याप परवानगी नसल्याने पार्सल सेवा मात्र सुरु ठेवण्यातच मालक समाधान मानत आहेत. 

सर्व नियम पाळून आम्ही सुरु करु

जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट सर्व हॉटेल्स सुरु करण्याला परवानगी द्यावी, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आम्ही ती सुरु करु. बाहेरुन मुक्‍कामाला येणारे रहिवाशी लॉकडाउनमुळे हॉटेल तसेच लॉजवर येण्याची शक्‍यता धूसर आहे. शासनाने हॉटेल चालकांना दिलेल्या सूचना वास्तवतेला धरुन नाहीत. हॉटेलचा केवळ 33 टक्‍के भाग वापरण्याचा नियमही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असला तरी तो सुस्पष्ट नाही. आधीच टाळेबंदीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीतून जात असताना दिलासा देण्याऐवजी शासन जाचक अटी लावत आहे. 
- मिलिंद खिलारे, उपाध्यक्ष, हॉटेल चालक असोसिएशन, सांगली 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion over rules: Hotel still "locked down" despite permission