मधुरिमाराजे छत्रपतींसाठी ‘कोल्हापूर उत्तर’मधून काँग्रेसचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांनी काँग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अखिल भारतीय काँग्रेसकडूनच या घडामोडी सुरू आहेत. प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांनी काँग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अखिल भारतीय काँग्रेसकडूनच या घडामोडी सुरू आहेत. प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अलीकडच्या काळातील २००४ चा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. यापूर्वी (कै.) दिलीप देसाई यांनी एकदा, तर माजी आमदार सुरेश साळोखे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोनदा सेनेकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. २००४ च्या निवडणुकीत मालोजीराजे यांना राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली आणि त्यात ते विजयी झाले; पण २००९ च्या निवडणुकीत त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामागची कारणेही अनेक आहेत. या पराभवानंतर राजकारणापासून अलिप्त असलेले हे कुटुंब पुन्हा राजकीय चर्चेचे केंद्र बनत आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे उमेदवारीही मागितली नाही, त्यामुळे नगरसेवक सत्यजित कदम काँग्रेसचे उमेदवार राहिले, पण त्यांचाही पराभव झाला. 

शाहू महाराजांचा वारसा, छत्रपती घराण्याची समाजातील क्रेझ व माजी मंत्री (कै.) दिग्विजय खानविलकर यांची कन्या म्हणून असलेली राजकीय पार्श्‍वभूमी या जोरावर विधानसभेसाठी कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव काँग्रेसकडून पुढे येत आहे. यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू होत्या, पण आजच ऋतुराज हे कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा सतेज पाटील यांनी केल्याने ऋतुराज यांच्या ‘उत्तर’मधील उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मग काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात उमेदवार कोण? याचा शोध पक्षाच्या पातळीवर सुरू झाल्यानंतर मधुरिमा राजे यांचे नाव पुढे येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress attempts for Madhurimaraj Chhatrapati from Kolhapur North