काँग्रेस-स्वाभिमानी आघाडी राहणार कायम?

- निवास चौगले
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी असलेली आघाडी कायम राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेच्या सत्तेत स्वाभिमानी काँग्रेससोबत आहे, या बदल्यात त्यांना महत्त्वाचे बांधकाम समिती सभापतीपदही देण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून असलेली ही आघाडी कायम ठेवण्यासाठी दोन्हींकडील नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरू आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून कोण कोणासोबत राहील या चर्चेलाही ऊत आला आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीची भाजपबरोबर आघाडीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीच अशी आघाडी झाली तर आश्‍चर्य वाटू नये, असे वक्‍तव्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिणमध्ये ही आघाडी आकाराला येत आहे. त्याच धर्तीवर राधानगरी, शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यांत ‘स्वाभिमानी’ची साथ कायम राहावी, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळापेक्षा डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात खासदारांना अधिक स्वातंत्र्य होते असे सांगत आपली खंत व्यक्त केली. नोटाबंदी व त्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे हाल यावरून श्री. शेट्टी सरकारवर नाराज आहेत. त्यातच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद देऊन श्री. शेट्टी यांना भाजपने शह दिल्याचे बोलले जाते. श्री. खोत यांना जादा खाती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघटनेतच फूट पाडत असल्याचा आरोप होत आहे. श्री. शेट्टी यांच्या नाराजीमागे हेही कारण असल्याचे बोलले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर आगामी जिल्हा परिषदेत श्री. शेट्टी आपल्यासोबतच राहतील यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. शिरोळ, हातकणंगले व राधानगरी तालुक्‍यात संघटनेचा प्रभाव आहे. या तीन तालुक्‍यांतील काही जागा संघटनेला देऊन इतर ठिकाणी त्यांचा पाठिंबा मिळेल, अशी रणनीती काँग्रेसकडून आखली जात आहे. यावर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्कामोतर्ब होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Congress continues to be the lead-proud?