श्रीगोंद्यातील कॉंग्रेस आघाडीचे नगरसेवक भाजपात डेरेदाखल

संजय आ. काटे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

श्रीगोंदे (नगर) : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नऊ महिन्यांपूर्वी भाजपातून कॉंग्रेसमध्ये गेलेले तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे आज त्यांच्या नगराध्यक्ष पत्नी शुभांगी पोटे यांच्यासह पुन्हा भाजपात डेरेदाखल झाले. दोन नगरसेवक वगळता इतर सगळेच भाजपात दाखल झाल्याने नगरपालिकेवर पुन्हा एकदा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी काल कॉंग्रेस पक्ष सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तोच कित्ता गिरवत आज नगराध्यक्ष शुभांगी पोटे त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे व इतर सहा नगरसेवकांनी पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे चार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे या प्रवेशाने तालुक्‍यातील कॉंग्रेस पुरती संपल्यात जमा झाली आहे.

अलिकडेच नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी पोटे यांनी पाचपुते यांना सोडून ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यासमवेत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांच्या व पाचपुते गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे वाद झाले होते. निवडणुकीतही प्रचाराची पातळी घसरली होती.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र, सगळे झाले गेले सगळे विसरून आज पोटे व पाचपुते समर्थकांची गळाभेट झाली. भाजप सोडताना पोटे यांनी नेते ठरवलेले भोस यांनाही सोडून देत पुन्हा भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress councilor of Shrigonda are in BJP