कॉंग्रेसला वीस वर्षात जमले नाही ते केले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

सांगली- भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून काम करताना गेल्या दीड वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट केला. महापुरासारख्या भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना यशस्वीपणे करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला वीस वर्षात जमला नाही, असा शहराचा विकास पारदर्शी पद्धतीने केला असा दावा मावळत्या महापौर सौ. संगीता खोत यांनी केले. 

सांगली- भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून काम करताना गेल्या दीड वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट केला. महापुरासारख्या भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना यशस्वीपणे करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला वीस वर्षात जमला नाही, असा शहराचा विकास पारदर्शी पद्धतीने केला असा दावा मावळत्या महापौर सौ. संगीता खोत यांनी केले. 

सौ. खोत म्हणाल्या,""गेल्यावर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता तसेच महापुरामुळे बराच कालावधी गेला. तरीही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला बक्षीस म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून विकासकामांचा धडाका लावला. शहरातील प्रमुख रस्ते, गटारी, मिरजेत अद्यावत भाजी मंडई उभारणी, मटण व फिश मार्केट दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला. ऐतिहासिक मिरज मार्केट, बालगंधर्व नाट्यगृह दुरुस्त केले. पहिले वारकरी भवनाच्या उभारणीचे काम सुरू केले.'' 

त्या म्हणाल्या,""कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळून जनतेने सन 2018 मध्ये महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिली. पक्षाच्या नेत्यांनी पहिल्या महापौरपदाचा मान मला देत विश्वास दाखवला. त्यातून सांगली, मिरज, कुपवाडच्या अपुऱ्या योजनांच्या पूर्तीसह विकासाचे शिवधनुष्य पेलले. घनकचरा प्रकल्पांतर्गत रिक्षा घंटागाड्या, औषध फवारणी ट्रक्‍टर खरेदी करून स्वच्छतेला शिस्त लावली. घरातूनच कचरा वर्गीकरण करून कचराकोंडाळेमुक्त शहर केले. घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत झालेला कायापालट हे त्याचेच द्योतक आहे.'' 

त्या म्हणाल्या,""सांगली, मिरजेतील प्रसुतीगृहासह सर्वच रुग्णालये सुसज्ज केली. आरसीएच अंतर्गत मंजूर दवाखानेही सुरू केले. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, सिग्नलसाठी पोलिस दलास दीड कोटी रुपयांचा निधी दिला. दिव्यांगांना तीन टक्के दिव्यांग कल्याण निधीतून सुविधा दिल्या. त्यांना अनुदानाचीही सोय करून दिली. महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी केली. पाणीपुरवठा, ड्रेनेज, घरकुल, शेरीनाल्यासह विविध अपुऱ्या योजनाही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अनेक कामे अद्यापही अपुरी आहेत. ती भाजपच्या माध्यमातून यापुढेही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.'' 

भ्रष्टाचारमुक्त कारभार 

सौ. खोत म्हणाल्या,""भाजपने सत्तेत येताना पारदर्शी भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दीड वर्षांत एकही ऐनवेळचा ठराव केला नाही. गैरकारभाराचे विषय येऊ दिले नाहीत. त्यामुळे माझी कारकीर्द उल्लेखनीय ठरेल, असा विश्वास वाटतो.'' 

महापुराचे आव्हान पेलले 

गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये सांगली-मिरजेत भीषण महापुराचे संकट उद्‌भवले. मात्र सरकार आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे आव्हान पेलले. नागरिकांना वाचवण्याबरोबरच त्यांचे उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले. राज्यभरातून मदतीसाठी संपर्क साधून चोख नियोजन करून मदत पोहोचविली. कुठेही जीवित हानी होऊ दिली नाही, असे सौ. खोत म्हणाल्या.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress did not do that