कॉंग्रेस-राष्ट्रवादीची गावपातळीपर्यंत बांधणी; भाजपचा सावध पवित्रा

प्रमोद जेरे
Friday, 20 November 2020

गावागावात पक्षीय संघटनाची विस्कटलेली घडी, गावपातळीवर कार्यकर्त्यांची अन्य पक्षात झालेली पांगापांग आणि भाजपच्या जिल्हा आणि तालुका स्तरावरील नेत्यांना गाव पातळीवरील राजकारणात नसलेले स्वारस्य यासह अनेक कारणांमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे अस्तित्वच कोठे दिसण्याची शक्‍यता देखील नाही.

मिरज : गावागावात पक्षीय संघटनाची विस्कटलेली घडी, गावपातळीवर कार्यकर्त्यांची अन्य पक्षात झालेली पांगापांग आणि भाजपच्या जिल्हा आणि तालुका स्तरावरील नेत्यांना गाव पातळीवरील राजकारणात नसलेले स्वारस्य यासह अनेक कारणांमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे अस्तित्वच कोठे दिसण्याची शक्‍यता देखील नाही. तुलनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिरज पूर्व भागातील मोठ्या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. 

मुळातच मिरज पूर्व भागात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचेच प्राबल्य आहे. परंतु गेल्या दशकातील काळाच्या ओघात बदललेली राजकीय समीकरणे आणि भारतीय जनता पक्षाच्या चाणक्‍य नीतिने पूर्व भागात भारतीय जनता पक्षाने पूर्व भागातील गावोगावी राजकारणात चंचुप्रवेश केला. यामध्ये अनेक गावच्या ग्रामपंचायतीसह सोसायट्याही पक्षाने ताब्यात घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने मालगावसारखी मोठी ग्रामपंचायतही भारतीय जनता पक्षाने काही अपक्ष सदस्यांना पक्षात घेऊन ताब्यात घेतली. 

आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज पूर्व भागातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाने आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले. परंतु गेल्या दोन-तीन वर्षात मिरज पूर्व भागातील राजकीय गणिते पुन्हा उलटी फिरू लागली. राज्याची सत्ता शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडे जाताच पूर्व भागातील काही कार्यकर्त्यांनी पुन्हा आपापल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला जाण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये गावागावातील कार्यकर्ते आपल्या पक्षात आणण्यासाठी बरीच खेचाखेची सुरू आहे. परंतु या डावपेचांत भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र सावध पवित्रा घेऊन गप्प आहेत. 

मुळातच भारतीय जनता पक्षातील कोणाही जिल्हास्तरावरील नेत्यांना ग्रामीण भागातील वर्चस्वाबाबतीत फारसे स्वारस्य नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील कामचलाऊ धोरण स्वीकारून ग्रामीण भागातील मतदारांना भुरळ पाडण्याचा गेल्या काही वर्षातील त्यांचा फंडा आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत चालू शकणार नाही याची पक्की खात्री भारतीय जनता पक्षातील जिल्हा नेत्यांना आहे. त्यामुळेच गाव पातळीवरील अपयशाचे धनी होण्यापेक्षा सावध पवित्रा घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील झुंजीची गंमत पाहणे भाजपा नेत्यांनी पसंत केले आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीची व्यूहरचना... 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मात्र आपल्या या डावात कोठेही भाजपला संधी मिळवून द्यायची नाही अशा प्रकारची व्यूहरचना रचना आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यापासून ते गाव पातळीवरील नेत्यांपर्यंत सर्व जण आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-NCP building at village level; BJP's caution is sacred