कॉंग्रेस संपलेला पक्ष  : प्रकाश आंबेडकर; निवडणुकीत नेते "हॉलिडे मूड'मध्ये

अजित झळके
Wednesday, 25 November 2020

आता कॉंग्रेस हा संपलेला पक्ष आहे. ऐन निवडणुकीच्या काळात या पक्षाचे नेते "हॉलिडे मूड'मध्ये असतात, त्या पक्षाचे कल्याणच आहे, अशा शब्दांत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज टीका केली.

सांगली : वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसला हात देण्याचा दोन वेळा प्रयत्न केला; मात्र त्यांना वंचितांना पुढे येऊ द्यायचे नसावे. या निवडणुकांतील दारुण पराभवानंतर आता कॉंग्रेस हा संपलेला पक्ष आहे. ऐन निवडणुकीच्या काळात या पक्षाचे नेते "हॉलिडे मूड'मध्ये असतात, त्या पक्षाचे कल्याणच आहे, अशा शब्दांत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज टीका केली. 

पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""आम्ही कॉंग्रेससोबत जायला कालही तयार होतो आणि आजही आमची तीच भूमिका आहे. लोकसभेला आम्ही राज्यातील 12 जागा मागितल्या होत्या. त्या दिल्या नाहीत. वंचित बहुजनचे लोक विजयी झाले तर सामान्यांची राजकारणात सरशी होईल, अशी भीती या प्रस्थापितांना वाटत असावी. ज्या बारा जागा मागितल्या होत्या, तेथील त्यांचे आठ उमेदवार पराभूत झाले. गेल्या सलग चार निवडणुकांत कॉंग्रेस राज्यात आपटली आहे. आता काय शिल्लक आहे?'' 

वंचितला सातत्याने भाजपची "बी' टीम म्हटले जाते. त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर ऍड. आंबेडकर म्हणाले, ""बिहारमध्ये कॉंग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यानंतर तेथील आरजेडी पक्षाने कॉंग्रेस हीच भाजपची बी टीम आहे, असा आरोप सुरू केला आहे.'' 

लव जिहादच्या नावे कायदे करू देत किंवा आणखी काही भूमिका घेऊ देत, याकडे पुरोगामी संघटनांनी ठरवून दुर्लक्ष करावे, असे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

मराठा आरक्षणप्रश्‍नी ते म्हणाले, ""मराठा आरक्षणाला अन्य कुणाचाही विरोध नाही. वास्तविक श्रीमंत मराठा हेच गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न करताहेत. कारण, खालचा वर्ग वर येऊ नये, हीच त्यांची भूमिका आहे.'' 

केंद्राशी विद्रोह महागात पडेल 
केंद्र शासन व राज्य शासन यांच्यात सातत्याने तणावाचे वातावरण आहे. याबाबत बोलताना ऍड. आंबेडकर म्हणाले, ""केंद्र शासनाने राबवलेली धोरणे राज्य शासनाला सतत डावलता येणार नाहीत. ती मान्य नाही केली, विद्रोह केला, तर त्याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागू शकतात. कलम 350 चा अंमल केंद्राने केला तर आश्‍चर्य वाटायला नको. आता केंद्राचे धोरण योग्य की अयोग्य, हा नंतरचा भाग.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress party is finished : Prakash Ambedkar; Leaders in the election are in a "holiday mood"