कॉंग्रेसचे निषेध व सत्याग्रह आंदोलन...हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्या 

घनश्‍याम नवाथे
Monday, 5 October 2020

सांगली-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर अत्याचारानंतर योगी आदित्यनाथ सरकारने जो निर्दयीपणा दाखवला, त्याविरोधात आज सांगली जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

सांगली-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर अत्याचारानंतर योगी आदित्यनाथ सरकारने जो निर्दयीपणा दाखवला, त्याविरोधात आज सांगली जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने स्टेशन चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, महिला आघाडीच्या शैलजा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. पिडित तरुणी आणि कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. 

हाथरस येथील दलित समाजातील मुलीवरील अत्याचारानंतर अख्खा देश हादरला. गुन्हेगार व भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने केलेल्या कृत्याने शरमेने मान खाली घालायला लागली. पीडितेला जिवंतपणी यातना देण्यात आल्या. परंतु मृत्यूनंतरही तिची अवहेलना करण्यात आली. अंत्यसंस्काराचा हक्कही निर्दयी उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाला दिला नाही. मध्यरात्री पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार उरकले. 

उत्तर प्रदेश सरकारचा उद्धटपणा येथेच थांबला नाही, तर पिडीत कुटुंबाला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना व प्रसार माध्यमांचा भेटू दिले नाही. घराजवळ शेकडो पोलिस तैनात करून नजरकैदेत ठेवले. कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्याशी हीन पातळीवरचे व्यवहार करून अटक केली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. 
योगी सरकारच्या मनमानी व असंवैधानिक कृत्याविरोधात कॉंग्रेस पक्ष संघर्ष करीत आहे. तिच्या कुटुंबाला न्याय आणि घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. युवक जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, मदिना बारूदवाले, वृषाली वाघचौरे, बिपिन कदम, नंदू शेळके, आदिनाथ मगदूम, अविराजे शिंदे, विजय आवळे, डॉ.नामदेव कस्तुरे, तौफिक शिकलगार, सनी धोतरे, आयुब निशाणदार, भाऊसाहेब पवार, अमित पारेकर, पैगंबर शेख, मौलाली वंटमोरे, अल्बर्ट सावर्डेकर आदी आंदोलनात सहभागी झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress protest and satyagraha movement. Give justice to the victim's family in Hathras