सांगली महापौरपदासाठी कॉंग्रेसची मोर्चेबांधणी

बलराज पवार
Saturday, 30 January 2021

सांगली महापौर निवड तीन आठवड्यांवर आली असताना इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सांगली : महापौर निवड तीन आठवड्यांवर आली असताना इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण हे दोघे कॉंग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यामुळे स्थायी सभापतीपाठोपाठ महापौरपदासाठीही कॉंग्रेस सत्ताधारी भाजपसमोर आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे.

फेब्रुवारीअखेरीस महापौर निवड होणार आहे. भाजपच्या सत्ताकाळातील निम्मा कार्यकाळ संपत आला आहे. पहिली अडीच वर्षे हे पद ओबीसी महिलांसाठी राखीव होते. आता ते खुल्या प्रर्वगासाठी राखीव आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुक सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्येही इच्छुकांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये महापौरपदासाठी इच्छुक आहेत. 

गटनेता निवडीवरून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांकडे लक्ष आहे. नाराजी दूर करून सर्वमान्य महापौर निवडण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर राष्ट्रवादीकडूनही गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी इच्छुक आहेत. कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर व मंगेश चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. 

कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची उत्तम साखळकर व अमर निंबाळकर यांनी भेट घेतली. यावेळी महापौर निवडीबाबत चर्चा झाली. साखळकर यांनी महापौरपदासाठी स्वत: इच्छुक असल्याचे त्यांना सांगितले. पक्षातील अन्य इच्छुकांची नावेही सांगितली. श्रीमती पाटील यांनी याबाबत पक्षाचे नेते मंत्री डॉ. विश्‍वजित कदम, विशाल पाटील आदी नेत्यांशीही चर्चा करण्यास त्यांना सांगितले. तसेच नगरसेवकांची मते घेण्यासही सुचवले आहे. शिवाय त्या स्वत: नगरसेवकांची मते आजमावण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर महापौरपदासाठी उमेदवारी ठरवण्यात येणार आहे.

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress in race of mayor of Sangali