esakal | साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

बोलून बातमी शोधा

साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

महामार्गाच्या वेग मर्यादा तपासणाऱ्या इंटरसेप्टर व्हेईकल स्पीडगनमधून तपासणी केल्यानंतर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनावर खूप दिवसांपुर्वी कारवाई झाली. परंतु ते वाहन पाेलिस अधीक्षकांचे असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली.

साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वहागाव (जि. सातारा)  : पुणे विभागाचे महामार्ग पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या शासकीय वाहनावर कऱ्हाड महामार्ग पोलिस केंद्राच्या पोलिसांनी थेट कारवाई केली. त्यांच्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल मालखेड (ता. कऱ्हाड) येथे कारवाई झाली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड महामार्ग पोलिस केंद्राचे कर्मचारी सहायक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली मालखेड फाटा हद्दीत महामार्गावर नेहमीप्रमाणे इंटरसेप्टर व्हेइकलमधील स्पीडगनमधून कारवाई करत होते. महामार्ग पोलिस पुणे विभागाचे अधीक्षक मिलिंद मोहिते हे उजाळाईवाडी (जि. कोल्हापूर) येथील महामार्ग पोलिस केंद्रात शासकीय वाहनातून (एमएच 12 आरआर 0745) वार्षिक तपासणीला निघाले होते. त्या वेळी मालखेड हद्दीत वाहनाच्या चालकाने कमाल वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस हवालदार मधुकर पवार यांनी स्पीडगनमधून त्या वाहन क्रमांकावर दंडात्मक कारवाई केली.

श्री. मोहिते जेव्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. त्या वेळी महामार्ग पोलिसांनी त्यांना मालखेड येथे थांबवले. त्यांनी नियमाचे उल्लंघन केल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर श्री. मोहिते यांनी वाहन चालकास दंडाची एक हजाराची रक्कम भरण्यास सांगितले. वाहन चालकाने लगेचच एक हजार रुपये दंड भरला. त्यानंतर श्री. मोहिते पुणे कार्यालयाकडे रवाना झाले. 

हवालदाराचेही कौतुक 

हवालदार मधुकर पवार यांनी शासकीय वाहनांवर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. ती थेट पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या शासकीय वाहनावरच. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. कारवाई केल्याबद्दल अधीक्षक मोहिते यांनीही हवालदार पवार यांना 500 रुपयांचे बक्षीस दिले. महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी यापुढेही स्पीडगनमधून कारवाईची मोहीम अशीच सुरू ठेवा, अशा सूचनाही श्री. मोहिते यांनी दिल्या. 

जरुर वाचा - Video : यासाठी उदयनराजे समर्थक आग्रही 

हेही वाचा - लाख रुपये दे नाहीतर तुझ्या नवऱ्याला मारून टाकू;अंगणवाडी सेविकेस धमकी अन्...
सातारा सातारा सातारा