सतत गर्दी अन्‌ अपघात :सांगलीतील बायपास चौक बनलाय मृत्यूचा सापळा

Constant crowds and accidents: Bypass Chowk In Sagali has become a death trap
Constant crowds and accidents: Bypass Chowk In Sagali has become a death trap

सांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपास चौक परिसरात महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आला. रस्ता चौकात अरूंद आहे. तेथे फुड कॉर्नरमुळे सततची गर्दी असते. तासगाव व इस्लामपूरकडे जा -ये करणाऱ्या वाहनांमुळे नेहमीच चौकात वर्दळ असते. अपघाताचा धोका टाळण्यासाठी रूंदीकरण तातडीने करण्याची गरज भासू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

सांगली-माधवनगर रस्त्यावरील वाहतूक काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बायपास रस्ता या रस्त्याला जोडण्यात आला आहे. इस्लामपूरकडून येणारी अवजड वाहने याच मार्गाने शहरात व मिरजेकडे येतात. ती वर्दळ आणखी वाढली आहे. वाहतुकीचा ताण लक्षात घेता दोन-तीन वर्षापूर्वी रस्ता रूंद करण्यात आला. परंतू बायपास रस्ता जेथे मिळतो तेथे माधवनगर रस्ता रूंद नाही. तेथे आल्यानंतर वाहनांचा वेग मंदावतो. तीन ठिकाणहून एकाचवेळी वाहने चौकात येत असल्यामुळे कोंडी होते. त्यातून वाहनधारकांच्या बेदरकारपणामुळे अपघाताला निमंत्रण दिले जाते. 

माधवनगर व बायपास रस्त्यावरील वाहतूक वाढली असताना तीन वर्षापासून हा परिसर फुड कॉर्नर बनला आहे. दुचाकी विक्री शोरूम्स, हॉटेल्स, चायनिज सेंटर तसेच भाजीपाला विक्री, वाहन दुरूस्ती केंद्रांची चौकात संख्या वाढलीय. त्यांच्याकडे येणारी वाहने बऱ्याचदा रस्त्यावरच पार्क केली जातात. त्यामुळे अरूंद रस्ता आणखीनच चिंचोळा बनतो. अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांची चौकात गर्दी होत असल्याने अनेकांना शंभर मीटरचा परिसर ओलांडून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. 

दुचाकीवरून निघालेल्या महिलेला अन्य दुचाकीची धडक बसल्यामुळे ती खाली पडल्यानंतर ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. नुकताच हा अपघात झाला. त्यानंतर चौक रूंदीकरणाचा विषय ऐरणीवर आला. दररोज किरकोळ अपघात येथे घडतात. त्यामुळे भविष्यातील मोठे अपघात टाळण्यासाठी तातडीने रूंदीकरण करणे आवश्‍यक बनले आहे. 

अशी आहे चौकात गर्दी 

  • शंभर मीटर परिसरात पाच हॉटेल्स, चायनिज सेंटर. 
  • पाच पान टपऱ्या व सात ते आठ हातगाडे 
  • दोन बेकरी, एक दवाखाना, पंक्‍चर काढण्याचे दुकान 
  • दुचाकी व फर्निचर शोरूम, सर्व्हिर्सिंग सेंटर 
  • चौकातच कॉम्प्लेक्‍सचे नियोजन सुरू 
  • कोट 

रूंदीकरण व चौपदरीकरणासाठी पाठपुरावा

बायपास चौकात ट्रॅफीक आयलॅन्डसह रस्ता चौपदरी करण्यासाठी 90 लाखांचा निधी अपेक्षित आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाबरोबच चौक रूंदीकरणासाठी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. श्री. चव्हाण यांनी निधीला मंजुरी दिलीय. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी तातडीने रूंदीकरण व चौपदरीकरणासाठी पाठपुरावा केला जाईल.'
- वर्षा निंबाळकर, नगरसेविका 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com